पुणे : हा पाहा बेरोजगारीवरचा तोडगा; रोज दोन तास काम अन् बघा किती मिळवतात!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

फक्त कष्ट एवढीच गुंतवणूक! 
कोथरूडमधील एका सोसायटीतील चार युवकांचा गट काम करतो. प्रत्येक जण रोज १५-२० गाड्या धुतात. ज्या वेळी सुट्टी घ्यायची असेल, तर त्यावेळी इतरांना त्या गाड्या वाटून दिल्या जातात. त्यासाठी त्यांनी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले आहेत. या गटातील राम जाधव म्हणाला, ‘‘या व्यवसायात सकाळी फक्त दोन तास काम करावे लागते. पाणी सोसायटीतील बोअरमधून मिळते. त्यात अन्य कोणती गुंतवणूक करावी लागत नाही. सुमारे १५ हजार रुपये सहज मिळतात. त्यामुळे उरलेल्या दिवसात इतर गोष्टी करता येतात.’’

पुणे - कष्टाची तयारी असेल, तर दरमहा चांगले उत्पन्न मिळविता येते, हे राम यांच्या उदाहरणातून अधोरेखित झाले आहे. सकाळी सहा ते साडेआठपर्यंत सोसायट्यांमध्ये गाड्या धुऊन आणि दिवसा साडेनऊ ते पाच वाजेपर्यंत नोकरी करून राम सुमारे ३५-४० हजार रुपयांचे उत्पन्न दरमहा मिळवत आहेत. अभियांत्रिकीच्या पदविकेला असलेला एक विद्यार्थी असेच काम करीत शिक्षण पूर्ण करीत आहे. उपनगरांतही शेकडो युवकांनी या धर्तीवर काम करीत रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. 

शहरात चारचाकींची संख्या सुमारे ७ लाखांवर पोचली आहे. शहर, उपनगरांतील गृहरचना सोसायट्यांचीही संख्या वाढली आहे.

सोसायट्यांमध्ये आता मोटारी उभ्या करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. त्यातच मोटारी दररोज धुणेही नागरिकांना अवघड वाटू लागले आहे. त्यासाठी मोटारी धुऊन देण्याचा व्यवसाय आता बहरू लागला आहे. मोटारींसाठी दरमहा ३०० ते ४०० रुपये आणि दुचाकींसाठी १५०-२०० रुपये घेऊन युवकांचे गट काम करू लागले आहेत. सकाळी सहा ते आठ दरम्यान हे युवक काम करून उर्वरित वेळेत नोकरी-व्यवसाय करतात. त्यातीलच एक राम धायगुडे. 

हिंगण्यात राहणारे राम हे एरंडवण्यातील संकुल सोसायटीत रोज सुमारे २० मोटारी आणि १२-१५ दुचाकी धुतात. त्यातून त्यांना दरमहा १५ हजार रुपये मिळतात. त्यानंतर सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच दरम्यान एका बांधकाम साइटवर सुपरवायझर म्हणून ते काम करतात. कोथरूडमधील राम येनपुरे यांचीही कथा अशीच आहे. सकाळी गाड्या धुऊन ते दिवसभर माळी काम करतात. त्यांचा मुलगा सौरवदेखील सकाळी ७ ते ८ दरम्यान गाड्या धुतो आणि अभियांत्रिकीच्या पदविकेचे शिक्षण घेत आहे. उपनगरांतील अनेक सोसायट्यांत हा ट्रेंड आता लोकप्रिय झाला आहे. 

गंगाधाम सोसायटीतील हेमंत कसबेकर म्हणाले, ‘‘आमच्या सोसायटीत सुमारे ६०० गाड्या आहेत. त्यातील २०० गाड्या युवक धुतात. त्यातील एकाने गाड्या 

धूत त्या पैशातून अभियांत्रिकीची पदवी मिळविली असून, त्याला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle Washing Business Income Employment