
तळीरामांच्या वाहनांचा सर्वसामान्यांना त्रास; वाहतूक पोलीस व पालिकेचे कारवाईकडे दुर्लक्ष
किरकटवाडी : मुख्य सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा ते नांदेड सिटी गेट या दरम्यान शेल पंपाच्या बाजूला असलेल्या वाइन शॉपच्या ग्राहकांच्या वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करुन नागरिक मद्य खरेदीसाठी जात असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. दररोज हा प्रकार घडत असताना पुणे शहर वाहतूक पोलीस किंवा पालिका प्रशासनाकडून अद्याप याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
शेल पंपाजवळ अगोदरच मुख्य रस्ता अरुंद आहे. त्यातच वाईन शॉप च्या ग्राहकांची वाहने अर्ध्या रस्त्यापर्यंत बेशिस्तपणे लागत असल्याने इतर सर्वसामान्य नागरिकांना कसरत करुन वाहने काढावी लागतात. तसेच शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी सायंकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही निर्माण होते.
इतर ठिकाणी तत्परतेने कारवाईसाठी सरसावणारे वाहतूक पोलीस किंवा पालिकेचे अधिकारी या ठिकाणी मात्र डोळेझाक करताना दिसत आहेत. सर्वसामान्य नागरिक प्रशासनाच्या अशा दुटप्पी भुमिकेमुळे संताप व्यक्त करत असून येथेही कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
प्रशासनाचे 'दुर्लक्ष'...
'सकाळ'ने यापूर्वीही बातमीच्या माध्यमातून या समस्येकडे वाहतूक पोलीसांचे लक्ष वेधले होते. तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर काही दिवस येथील परिस्थिती सुधारली होती परंतु अवघ्या काही दिवसांत पुन्हा समस्या 'जैसे थे' झाली. त्यामुळे कारवाईचा दिखावा न करता याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
"संबंधित व्यावसायिकाने नियोजन करणे आवश्यक आहे. रस्त्यावर कशाही गाड्या उभ्या असतात. दररोज घरी येताना त्रास सहन करावा लागतो." अर्जुन सुपेकर, नागरिक."या ठिकाणी अगोदरच रस्ता अरुंद असून दारु खरेदी करण्यासाठी जाणारे बिनधास्त रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने इतरांनी जायचे कसे? प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी."
- महेश गायकवाड, नागरिक.
"काही नागरिक दुकानाच्या बाजूला मुख्य रस्त्यावर वाहने उभी करुन तेथेच मद्यपान करत बसतात. हे पोलीसांना दिसत नसावे का? या अर्ध्या रस्त्यापर्यंत लावलेल्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. वेळीच कारवाई होणे आवश्यक आहे."
- राजेश जाधव, नागरिक.
"यापूर्वीही सदर वाइन शॉप मालकाला नोटीस दिली होती व काही दिवसांपूर्वी पुन्हा नोटीस दिली आहे. वाइन शॉप मालकाने कर्मचारी ठेवून व्यवस्था करतो असे सांगितले होते परंतु प्रत्यक्षात तसे झालेले नाही. पालिकेकडे पत्रव्यवहार केला असून संबंधित ठिकाणी 'नो पार्किंग'चे बोर्ड लावण्यास सांगितले आहे. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या प्रत्येक वाहनावर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मोठ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे."
- पांडुरंग वाघमारे, प्रभारी अधिकारी, सिंहगड रोड वाहतूक विभाग, पुणे शहर पोलीस.