esakal | लर्निंग लायसन्सच्या परीक्षेसाठी मराठीत व्हिडिओ उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

Driving License

लर्निंग लायसन्सच्या परीक्षेसाठी मराठीत व्हिडिओ उपलब्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - लर्निंग लायसन्सची (Learning License) ऑनलाइन परीक्षा (Online Exam) देणाऱ्या उमेदवारांसाठी परिवहन खात्याने (RTO) अखेर मराठी भाषेतील व्हिडिओ उपलब्ध करून दिला आहे. सुमारे ९४ टक्के उमेदवार मराठी भाषिक (Marathi Language) असले तरी, त्यांच्यासाठी या पूर्वी इंग्रजी आणि हिंदी भाषेतच व्हिडिओ (Video) होते. मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा ‘सकाळ’ने उपस्थित केल्यावर परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मराठी भाषेतील व्हिडिओ तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला होता. (Video Available in Marathi for Learning License Exam)

लर्निंग लायसन्स ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याची सुविधा राज्य सरकारच्या परिवहन कार्यालयाने नागरिकांसाठी नुकतीच उपलब्ध करून दिली. मात्र, ऑनलाइन परीक्षा देताना वाहतुकीच्या नियमांची माहिती देणारा व्हिडिओ उमेदवारांनी पहायचा आहे. त्यासाठी इंग्रजी भाषेतील व्हिडिओ १२ मिनिटांचा तर, हिंदी भाषेतील व्हिडिओ सुमारे ८ मिनिटांचा होता. परंतु, मराठी भाषेतील व्हिडिओ त्यात नव्हता. त्यामुळे ‘परिवहन खात्याकडूनच मराठीची उपेक्षा’ असे वृत्त ‘सकाळ’ने २२ जून रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मराठीतील व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला होता. तसेच मराठीची उपेक्षा करण्याचा राज्य सरकारचा कोणताही उद्देश नसल्याचे स्पष्ट केले होते.

हेही वाचा: कोरोना मृत्यूमध्ये ‘साठी’च्या वरचे सर्वाधिक

परिवहन आयुक्त कार्यालयाने वाहतुकीच्या नियमांची माहिती देणारा मराठी भाषेतील व्हिडिओ ‘परिवहन’ या संकेतस्थळावर ‘सारथी’मध्ये उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी एका मराठी अभिनेत्याचा आवाज वापरण्यात आला आहे. परिवहन उपायुक्त संदेश चव्हाण यांनीही मराठी भाषेतील व्हिडिओ तातडीने उपलब्ध करण्यासाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरबरोबर (एनआयसी) समन्वय साधला होता. आता मराठी भाषेत वाहतुकीच्या नियमांची माहिती घेऊन, उमेदवारांना आजपासून परीक्षा देणे शक्य झाले आहे.

loading image