'तो' व्हिडीओ पुण्यातला नाहीच; व्हॉट्सअप बहाद्दरांकडून पुन्हा 'होऊ दे व्हायरल'! 

Pune_Crime
Pune_Crime

पुणे : कोरोना आजारासंबंधी घरोघरी सर्वेक्षण करण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या महिलेसह तिघांनी वृद्ध नागरीकाचे तोंड दाबून घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. यासंबंधीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडीओ पुण्यातील रविवार पेठेतला असल्याचे सांगत व्हॉटसअपवर व्हायरल करण्यात आला. मात्र, तो व्हिडीओ पुण्यातील नसून साताऱ्याच्या रविवार पेठेतील असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. 

साताऱ्याच्या रविवार पेठेतील एका वृद्ध नागरिकाच्या घरात एका महिलेसह तिघेजण आले होते. त्यांनी वृद्ध नागरिकास कोरोनाचे सर्वेक्षण करायचे असल्याचे सांगून वृद्धाला माहिती देण्यास सांगितले. त्याचवेळी त्यांनी वृद्ध नागरीकाचे तोंड दाबून घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना बंदुकीचा धाकही दाखविला. मात्र, शेजाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर ते तत्काळ त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. नागरिकांनी तिघांनाही पकडून चांगलाच चोप दिला. तसेच पोलिसांना तत्काळ खबर दिली. 

दरम्यान, हा सर्व प्रकार साताऱ्यातील रविवार पेठेमध्ये घडला होता. असे असतानाही ती रविवार पेठ पुण्यातली असल्याचे सांगत पुणेकरांनो काळजी घ्या, असा फुकटचा सल्ला देत तो व्हिडीओ व्हायरल करण्याचा प्रकार घडला. या संदर्भात फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर म्हणाले, "संबंधीत घटना पुण्यात घडलेली नाही. ही घटना सातारा येथील आहे. अनेकांनी आमच्याकडे याबाबत विचारणा केली. मात्र नागरीकांनी अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये. कोणत्याही प्रकारे खातरजमा न करता अशा प्रकारचे व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न करु नये. तसेच या संदर्भातील व्हिडीओ पुण्यात व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com