Vidhan Sabah 2019 : विरोधकांच्या खेळीने पुण्यात आलीय रंगत!

संभाजी पाटील
Monday, 7 October 2019

पुणे : पुण्यात भाजपशी दोन हात करायचे असतील, तर विरोधकांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नव्हता. मोदी लाटेत सर्वांनीच वाहून जाण्यापेक्षा बंडखोरांनी माघारीचा दाखविलेला शहाणपणा पुण्यातील लढती चुरशीच्या होण्यास उपयुक्‍त ठरणार आहेत.

पुणे : पुण्यात भाजपशी दोन हात करायचे असतील, तर विरोधकांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नव्हता. मोदी लाटेत सर्वांनीच वाहून जाण्यापेक्षा बंडखोरांनी माघारीचा दाखविलेला शहाणपणा पुण्यातील लढती चुरशीच्या होण्यास उपयुक्‍त ठरणार आहेत. भाजपला आता कोथरूडसह शहरातील आठही मतदारसंघात अधिक ताकदीने लढावे लागेल, हेही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट झाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल सव्वातीन लाखाचे मताधिक्‍य मिळाले. त्यामुळे विधानसभेत यापेक्षा वेगळे चित्र असणार नाही, असे अनेकांना वाटत होते. अर्थात भाजपची प्रत्येक मतदारसंघात तेवढी मजबूत पक्षसंघटना आणि कार्यकर्त्यांची फळीही आहे. भाजपची ही मजबूत तटबंदी फोडण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी काय करणार याकडे लक्ष लागले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही पक्षांनी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पहिले सकारात्मक पाऊल टाकले. दुसरे म्हणजे ज्याठिकाणी आपली ताकद नाही तेथे मित्रपक्षाला बळ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपविरोधी मतांच्या फुटीची शक्‍यता कमी केली. कोथरूड हे त्याचे उदाहरण सांगता येईल. दोन्ही काँग्रेसला याठिकाणी चांगला उमेदवार नव्हता त्यामुळे तेथे मनसेला पाठिंबा दिला तर ज्याठिकाणी मनसेचा उमेदवार नाही अशा मतदारसंघात मनसेने आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेस आघाडी आणि मनसेलाही बळ येईल, असे म्हणता येईल.

पुणे जिल्ह्यात शिवसेनेला फटका; आघाडीच्या जागा वाढणार?

पर्वतीत थेट लढत
काँग्रेस आघाडीच्या प्रमुख बंडखोरांनी माघार घेतली नसती, तर शहरातील चित्र आणखीच बिघडले असते. पर्वतीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी माघार घेऊन राष्ट्रवादीच्या अश्‍विनी कदम यांना मोठा दिलासा दिला. त्यामुळे येथे भाजपच्या माधुरी मिसाळ आणि कदम यांच्यात थेट लढत होईल. राष्ट्रवादीने प्रथमच महिला उमेदवार दिल्याने त्याचा पक्षाला किती उपयोग होतो, हे पाहण्यासारखे असेल.

वडगावशेरी मतदारसंघात शिवसेनेचे बंड थंड

कसब्यात शिवसेनेनं काढलं भाजपचं उट्टं
कसबा मतदारसंघात काँग्रेसने सुरवातीपासूनच बंडखोरी रोखण्यासाठी नेटके प्रयत्न केले. नगरसेवक रवींद्र धंगेकर यांचे मोठे बंड थंड करण्यात आले. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्याशिवाय माजी महापौर कमल व्यवहारे यांचाही अर्ज मागे घेण्यात आला.. याविरुद्ध स्थिती भाजप-सेना युतीची राहिली. शिवसेनेला शहरात एकही जागा न दिल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने कसब्यात बंडखोरी केली. नगरसेवक विशाल धनवडे यांचा अर्ज मागे घेण्यात पक्षाला यश आले नाही. त्यामुळे कसब्यातील लढत आता तिरंगी होणार आहे. अर्ज भरण्याच्या दिवशी धनवडे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. आता धनवडे नेमकी कोणाची मते खाणार हे महत्त्वाचे ठरेल. गिरीश बापट मैदानात नसतानाची निवडणूक भाजप कशी लढणार हाही उत्सुकतेचा विषय असेल.

कॅन्टोंमेंटमध्ये दलित-मुस्लिम मते कोणाकडे?
पुणे कॅन्टोंमेंटमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी बंडखोरी केली होती. पण त्यांची मनधरणी करण्यात पक्षाला यश आले. त्यांनी माघार घेतल्याने माजी मंत्री रमेश बागवे यांना दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे यांचीही माघार झाल्याने भाजपला दिलासा मिळाला. भाजपने याठिकाणी आमदार दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. कांबळे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील 30 ते 40 नागरिकांनी अर्ज भरून भाजपला आव्हान दिले होते. पण यातील बरेच अर्ज बाद झाले तर आज उरलेल्यांनी माघार घेतली. भाजपच्या दोन बंडखोरांची माघारही झाली. त्यामुळे येथेही कांबळे- बागवे अशी थेट लढत होईल. याठिकाणी एमआयएम आणि आपचा उमेदवार भाजपविरोधातील मते खेचेल असाच अंदाज आहे.

वडगावशेरी-शिवाजीनगरमध्ये कुस्ती रंगणार
वडगावशेरीतही शिवसेनेने आव्हान दिले होते. तेथे नगरसेवक संजय भोसले यांची समजूत काढण्यात आली. त्यामुळे येथे महायुती विरुद्ध काँग्रेस आघाडी अशी थेट लढत होईल. एमआयएम येथे दलित-मुस्लिम मते किती खेचणार यावर विजयाचे गणित पक्के होईल. शिवाजीनगरमध्येही भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांची काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्याशी थेट लढत आहे. लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या तुलनेत भाजपचे मताधिक्‍य घटले होते, त्यामुळे हा मतदारसंघातील लढतही चुरशीची ठरणार आहे. खडकवासल्यात शिवसेनेचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. रमेश कोंडे यांनी माघार घेतली पण शिवसेनेची मते इतरत्र जाणार नाही याची दक्षता भाजपला या मतदारसंघात घ्यावी लागणार आहे. हडपसरमध्ये भाजपला एकच उमेदवार देण्यात विरोधकांना अपयश आले. राष्ट्रवादीचे चेतन तुपे, मनसेचे वसंत मोरे यांच्यात विरोधी मतांचे विभाजन होणार आहे. पण तीनही उमेदवार ताकदीचे असल्याने येत्या दहा दिवसात कोण वातावरण फिरवणार हे स्पष्ट होईल. या वेळी भाजप विरोधकांनी आठही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न करून लढाईत आम्हीही तेवढ्याच ताकदीने उतरलो आहोत, हे मात्र नक्की दाखवून दिले आहे. आता पुढच्या दहा दिवसात कसे वातावरण फिरते हे पाहण्यासारखे असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabah 2019 sambhaji patil writes about challenges of bjp in pune city