आमदारांनी इंदापूरचे दीड हजार कोटींचे नुकसान केले; हर्षवर्धन पाटलांचा आरोप

डॉ. संदेश शहा
Monday, 14 October 2019

गेल्या पाच वर्षांत लोकप्रतिनिधींनी तालुक्यास हक्काचे पाणी मिळवून न दिल्याने तालुक्याचे सुमारे 1500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा आऱोप भाजपचे इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

इंदापूर : विरोधकांकडून आम्ही मंत्रिमंडळात असताना काहीही काम केले नाही असा आरोप राजकीय स्वार्थासाठी करत आहेत. गेल्या पाच वर्षांत लोकप्रतिनिधींनी तालुक्यास हक्काचे पाणी मिळवून न दिल्याने तालुक्याचे सुमारे 1500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा आऱोप भाजपचे इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

उजनी धरण होण्यापूर्वी या परिसरात हुलगे पिकत होते तर, अनेक शेतकरी दुसऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून जात होते. मात्र दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांनी उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी महत्व ओळखून बिजवडी येथे सहकारी साखर कारखाना सुरू केला. दिवंगत आमदार राजेंद्रकुमार घोलप यांनी या परिसरात उसशेतीस प्राधान्य दिले. त्यानंतर मी या कारखान्याची गाळप क्षमता वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक न्याय दिला. त्यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम झाला असतानाही विरोधक आम्ही मंत्रिमंडळात असताना काहीही काम केले नाही असा आरोप राजकीय स्वार्थासाठी करतात. त्यांनी मागील 5 वर्षांत लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्यास हक्काचे पाणी देखील मिळवून न दिल्याने तालुक्याचे सुमारे 1500 कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे या निवडणुकीत जनता त्यांचा पराभव करून महायुतीच्या उमेदवारास प्रचंड मताधिक्याने विजयी करणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले.

हर्षवर्धन पाटील यांनी कालठण नंबर 1 व 2, नरुटवाडी, पोंदकुलवाडी, गागरगाव, राजवडी, अगोती नंबर 1 व 2, चांडगाव, भावडी येथे मतदारांशी संपर्क साधत आपली भूमिका पटवून दिली. या वेळी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार कर्मयोगी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, इंदापूर बँकेचे संचालक ऍड रामकृष्ण मोरे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त तुकाराम मोरे यांच्या हस्ते झाला. श्री पाटील म्हणाले, ‘शेती, सहकार,शिक्षण, आरोग्य, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपण एक नवीन मापदंड तयार केला. त्यामुळे राज्यात इंदापुरचे नाव झाले आहे. त्यामुळे इंदापुरचा नावलौकिक वाढविण्यासाठीआपण दगाबाज राष्ट्रवादी काँगेस व वाऱ्यावर सोडणाऱ्या काँग्रेसशी फारकत घेऊन केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपात प्रवेश केला आहे. त्या मुळे तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे, युवापिढीस रोजगार देणे तसेच युवती व महिलांचे सक्षमीकरण करून तालुका राज्यातील अग्रेसर तालुका बनवण्यासाठी कटीबद्ध आहे.’

या वेळी दादासाहेब गलांडे, सचिन जाधव यांनी विकासरत्न हर्षवर्धन पाटील यांना विक्रमी मता- धिक्याने विजयी करा असे आवाहन केले. यावेळी विठ्ठल सपकळ, माऊली बनकर, दीपक जाधव, महेंद्र रेडके, डॉ. लक्ष्मण सपकळ, गोरख पाडुळे ,दत्तात्रय जगताप, मधुकर क्षीरसागर, अकबर शेख, अब्दुल शेख, बंडानाना सपकळ, अमित चव्हाण, विजय पाडुळे, सतीश घाडगे उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचलन अविनाश शिंदे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 bjp leader harshvardhan patil speech indapur