Vidhan Sabha 2019 : दिग्गजांमुळे चुरस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

शहरातील चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदार अनुक्रमे लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गजांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे तीनही मतदारसंघांत चुरस वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

विधानसभा
पिंपरी - शहरातील चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदार अनुक्रमे लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गजांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे तीनही मतदारसंघांत चुरस वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

भाजप-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा सोमवारी (ता. ३०) झाली. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी अस्तिवात आली नव्हती. मात्र, युतीच्या घोषणेपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना रविवारी (ता. २९) एबी फॉर्मवाटप केले. त्यात शहरातील पिंपरीचे आमदार ॲड. चाबुकस्वार यांचाही समावेश आहे. त्यामुळे भाजप पिंपरीबाबत काय निर्णय घेतो, याकडे लक्ष लागले आहे. येथून निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे आठ जण इच्छुक आहेत. दरम्यान, सोमवारी चिंचवडचे आमदार जगताप व भोसरीचे आमदार लांडगे यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेचे दिग्गज पदाधिकारी  आणि मनसेेकडून उमेदवारी अर्ज इच्छुकांनी नेल्याने चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

पिंपरी
पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी ३३ जणांनी ९० अर्ज घेतले. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुलक्षणा शीलवंत-धर, शेखर ओव्हाळ, उत्कर्ष शिंदे, भाजपकडून राजेश पिल्ले, अमित गोरखे, तेजस्विनी कदम, शिवसेनेकडून सचिन भोसले, काँग्रेसकडून सुंदर कांबळे, वंचित बहुजन आघाडीकडून गणेश ऊर्फ बाळासाहेब गायकवाड, शेकापकडून दिलीप पाटील यांनी, तर अपक्ष म्हणून जितेंद्र ननावरे यांचा समावेश आहे. एका अपक्ष उमेदवाराने दोन अर्ज दाखल केले. महायुतीचा मित्रपक्ष आरपीआयच्या (आठवले गट) नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनीही उमेदवारी अर्ज नेला आहे.

चिंचवड
चिंचवड मतदारसंघातून १५ उमेदवार ३९ अर्ज नेले. यात राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचे नामसाधर्म्य असलेल्या व्यक्तीने तीन, विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांनी चार, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी चार, राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर व प्रशांत शितोळे यांनी प्रत्येकी चार, राजेंद्र काटे व एकनाथ जगताप यांनी प्रत्येकी एक अर्ज नेला आहे.

भोसरी
भोसरी मतदारसंघातून १३ उमेदवार ३८ अर्ज नेले. यात राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी चार, शांताराम भालेकर यांनी चार, भाजप नगरसेवक रवी लांडगे यांनी अपक्ष दोन, वंचित बहुजन आघाडीचे हरेश डोळस यांनी चार, दत्तात्रेय जगताप यांनी चार, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे रामदास ताटे यांनी दोन, माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष तीन, विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी चार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मारुती पवार यांनी एक व महाराष्ट्र मजूर पक्षाचे भाऊ अडागळे यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Constituencies to increase competition