पुणे : फ्रान्सकडून घेण्यात येत असलेल्या राफेल विमानाची पूजा केल्यावरून सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यावर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी प्रतिक्रिया दिली असून, ‘मला जे योग्य वाटलं ते मी केलं,’ असं स्पष्टीकरण राजनाथसिंह यांनी दिलंय. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही राजनाथसिंह यांच्या सुरात सूर मिसळला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पुण्यात होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली मतं मांडली. त्या म्हणाल्या, ‘सध्या बँकांचाविषयी गाजत आहे. सरकारने याची दखल घेतली असून, मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकांमधील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी याविषयी या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.’ पंजाब महाराष्ट्र बँकेसंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांसोबत बोलणे झाले आहे. ठरलेल्या प्रक्रियेनुसार योग्य ती कारवाई होईल. पण ग्राहकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केल्याचे सीतारामन यांनी यावेळी सांगितले.
‘आमची श्रद्धा आहे’
फ्रान्समध्ये संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी राफेल विमानांची पूजा केली. त्यावरून सरकार आणि राजनाथसिंह यांच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. त्यावर निर्मला सीतारामन यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, ‘पूजा करताना लिंबु मिरची चढवली तर, त्यात चूक काय? ही अंधश्रद्धा नाही. आमची श्रद्धा आहे.’
दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘गेल्या 5 वर्षांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांसाठी काम केलंय. विशेष करून पाण्याच्या विषयात मोठं काम आहे. शेती तसेच शहरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यश आलंय. अजूनही काम बाकी आहे. आम्ही ते पूर्णत्वाला नेऊ.’ पूरग्रस्त कोल्हापूर सांगलीसाठी आर्थिक मदत देण्याबाबत निकष ठरलेले आहेत. त्यानुसार मदत उपलब्ध होईल. त्यात कोणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही, असेही त्या म्हणाल्या.