पवारांना टार्गेट करण्याचा डाव भाजपच्या अंगलट | Vidhan Sabha 2019 Results

सम्राट फडणीस
Thursday, 24 October 2019

पक्षांतरे, राष्ट्रीय मुद्दे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांवर आरोपांच्या फैरी, अशी चार शस्त्रे भाजपने वापरायला सुरवात केली होती. एकाचवेळी शिवसेनेला रोखणे आणि पवारांना नेस्तनाबूत करणे, अशा दोन मोहिमा हाती घेतल्या गेल्या. प्रत्यक्षात निकाल हाती आले, तसे चारही शस्त्रे चालली नसल्याचे स्पष्ट झाले.

भाजपच्या शतप्रतिशत सत्तेच्या इच्छा-आकांक्षांना सुरुंग लावण्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील 44 जागांच्या निकालाने मोठा हातभार लावला. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात किमान पंचवीस जागा निवडून येतील, अशी भाजपची व्यूहरचना होती. ती करताना पक्षांतरे, राष्ट्रीय मुद्दे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांवर आरोपांच्या फैरी, अशी चार शस्त्रे भाजपने वापरायला सुरवात केली होती. एकाचवेळी शिवसेनेला रोखणे आणि पवारांना नेस्तनाबूत करणे, अशा दोन मोहिमा हाती घेतल्या गेल्या. प्रत्यक्षात निकाल हाती आले, तसे चारही शस्त्रे चालली नसल्याचे स्पष्ट झाले. पवारांना केलेले टार्गेट भाजपच्याच अंगावर उलटले.

उत्तर महाराष्ट्रात युतीचे गणित कोणी बिघडवले?

शिवसेनेचे जरूर मोठे नुकसान झाले; तथापि राष्ट्रवादीचा सर्वाधिक फायदा झाला आहे. फक्त आकडेवारीच्या हिशेबात भाजपला 2014 च्या निवडणुकीपेक्षा एक जागा जास्तीची मिळाली आणि शिवसेना पाच जागांवरून एका जागेपर्यंत घसरली. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पश्‍चिम महाराष्ट्रातील दहा जागांवरून 19 जागांपर्यंत विस्तारला.
सर्वाधिक प्रभावशाली पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने तीन जागांवरून दहा जागांवर झेप घेतली. पुणे महापालिका क्षेत्रात आठपैकी दोन जागा भाजपकडून राष्ट्रवादीने हिसकावून घेतल्या. इंदापूरसारख्या चर्चेतील मतदारसंघात ऐनवेळी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना मतदारांनी घरी बसवले. त्याचवेळी भाजपने सातत्याने टार्गेट केलेल्या बारामती मतदारसंघाने अजित पवार यांना राज्यातील विक्रमी मताधिक्‍य दिले. विजय शिवतारे आणि बाळा भेगडे या अनुक्रमे शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांचा दणदणीत पराभव युतीच्या जिव्हारी लागेल. राज्यातील क्रमांक दोनचे मंत्री म्हणून गेल्या पाच वर्षांत उदयास आलेल्या चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून विजय मिळाला असला, तरी तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या किशोर शिंदे यांच्याशी द्यावी लागलेली लढत पाटील यांना विसरता येणार नाही. दौंड, खडकवासला या दोन जागा भाजपने निसटत्या फरकाने जिंकल्या. तिथेही राष्ट्रवादीने भाजपला दमवले.

80 वर्षांच्या तरुणाने पुन्हा बांधली राष्ट्रवादीची मोट

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचा निकाल शेतकरी कामगार पक्षाने धडा घ्यावा असा आहे. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि तिथे शिवसेनेने पश्‍चिम महाराष्ट्रातील एकमेव जागा जिंकली. या पराभवाच्या खोलात शेकापला जावे लागेल; अन्यथा पक्षाचे उरलेसुरले अस्तित्व संपुष्टात आल्याचे मान्य करावे लागेल. शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यातून अपेक्षा होत्या. विद्यमान सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी उमेदवार निवडताना लक्ष घातले होते. ऐन निवडणूक काळात शिवसेनेला बंडखोरीचा सामना करावा लागला. त्याचे प्रत्यंतर निकालात उमटले आहे.

विधानपरिषदेत धनंजय मुंडेंच्या जागी आता कोण?

रोहित पवार यांचा राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून झालेला उदय ही महत्त्वाची घटना पश्‍चिम महाराष्ट्रात घडली. पवार घराण्याचा राजकारणातील पहिला पराभव लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांच्या रूपाने झाला. त्यामुळे रोहित यांचे आव्हान नाहीच, असा भाजपचा भ्रम होता. तो भ्रम रोहित यांनी धडाक्‍यात विजय मिळवून दूर केला. सर्वाधिक पक्षांतरे झालेल्या जिल्ह्यात भाजपने सर्व अकरा मतदारसंघांत विजयाची तयारी केली. विरोधी पक्षनेतेपद त्यागून थेट भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील हे या तयारीचे शिल्पकार. निकालानंतर अकरापैकी पाच जागा राष्ट्रवादीकडे आणि दोन काँग्रेसच्या आल्या आहेत. या जिल्ह्यातील निकालाचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतील.
शेती आणि सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपने जमिनीवरील प्रश्नांना हात घालून त्यांची सोडवणूक केल्याचे पाच वर्षांत दिसले नाही. केवळ राष्ट्रीय राजकारणाचे ढोल पिटले. कर्कश्‍श आवाजाला कंटाळून मतदारांनी कानावर हात ठेवले आणि दान राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकले, असे निकाल सांगतो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 maharashtra result samrat phadnis writes blog about ncp and bjp