Vidhan Sabha 2019 : अजित पवारांचे सूचक काकडे यांच्याकडून पडळकरांचा सत्कार

मिलींद संगई
Friday, 4 October 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामतीचे उमेदवार अजित पवार यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही करणारे सतीश काकडे यांनी आज भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामतीचे उमेदवार अजित पवार यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही करणारे सतीश काकडे यांनी आज भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सतीश काकडे हे सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करताना अजित पवार यांच्या समवेत होते. त्यानंतर कन्हेरी येथे झालेल्या सभेत देखील सतीश काकडे उपस्थित होते. अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना आणि जाहीर प्रचार सभेत देखील सतीश काकडे यांचा आदराने उल्लेख केला. 

सभा संपल्यानंतर संध्याकाळी गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करतानाचा सतीश काकडे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत खळबळ उडाली. गोपीचंद पडळकर हे आपल्याला भेटण्यासाठी नीरा कॅनाल सोसायटी संघात आले होते, याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचा आदर सत्कार करण्याची आमची पद्धत आहे, त्यानुसार आम्ही त्यांचे स्वागत केले. मात्र, मी अजित पवार यांचा सूचक म्हणून सही केलेली असल्याने माझ्यावर जबाबदारी आहे व मी पूर्णपणे अजित पवार यांचेच काम करणार आहे, अशी स्पष्ट कल्पना मी गोपीनाथ पडळकर यांना माझ्या भाषणात देखील दिली होती, असे सतीश काकडे यांनी केला.

मी तुम्हाला फक्त आशीर्वाद देऊ शकतो कारण माझा बाण सुटलेला आहे असे मी पडळकर यांना सांगितले, असेही काकडे यांनी यावेळी स्पष्ट केले. पडळकर यांनी ही माझी भूमिका मान्य करत मला फक्त आशीर्वाद द्या अशी अपेक्षा व्यक्त केली. मी या निवडणुकीत पूर्णपणे अजित पवार यांचे काम करणार असल्याचे सतीश काकडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Satish Kakade honored Gopichand Padalkar