esakal | Vidhan Sabha 2019 : शिवसेनेचे बंडोबा थंड?
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेचे बंडोबा थंड?

शहरात मनसेचे उमेदवार निश्‍चित करण्यात आणि शिवसेनेच्या बंडखोरांना शांत करण्यात भाजपच्या एका नेत्याचा हात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शहरातील आठही जागा कायम राहाव्यात आणि स्वतःवर फुटणारे खापर टाळण्यासाठी या नेत्याने ही फिल्डिंग लावली असल्याचे बोलले जात आहे.

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेचे बंडोबा थंड?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 
पुणे - शहरात मनसेचे उमेदवार निश्‍चित करण्यात आणि शिवसेनेच्या बंडखोरांना शांत करण्यात भाजपच्या एका नेत्याचा हात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शहरातील आठही जागा कायम राहाव्यात आणि स्वतःवर फुटणारे खापर टाळण्यासाठी या नेत्याने ही फिल्डिंग लावली असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती झाली आहे. युतीमध्ये शहरातील आठही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले आहेत. त्यामुळे डावलले गेल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहेत. त्यातच कोथरूड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी डावलून ती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिली आहे. परिणामी, या मतदारसंघात शिवसेनेकडून छुपा विरोध होत आहे. हे लक्षात आल्याने संधीचा फायदा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय शिवसेनेच्या एका नेत्यांनी घेतला होता. त्यासाठी भाजप सोडून मनसेसह अन्य पक्षांची मोट बांधण्यात त्याला यश आले होते. रिंगणात उतरण्याचे जवळपास निश्‍चित झाले होते. या नेत्याचे भाजपातील एका नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या नेत्याने बंडखोरी केली असती तर त्यांचे खापर भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या डोक्‍यावर फुटले असते. हे लक्षात आल्याने त्याने सर्व सूत्रे फिरविली. त्यासाठी मनसेचे शहरातील आणि मुंबईतील एका नेत्यांची मदत घेऊन शिवसेनेत होणारी बंडखोरी रोखण्यात भाजपच्या ‘त्या’ नेत्यास यश आले. 

कसबा विधानसभा मतदारसंघातदेखील भाजपच्या ‘त्या’ नेत्याने ऐनवेळी चाव्या फिरविल्या. या मतदारसंघात मनसेकडून रूपाली पाटील आणि आशिष देवधर या दोघांनी उमेदवारी मागितली होती. त्यापैकी पाटील यांचे नाव पक्षाने निश्‍चित केले होते. 

दरम्यान, काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचे नाव निश्‍चित झाल्याची माहिती मिळताच भाजपातील या नेत्याने चलाखी दाखवत कसब्यातील उमेदवारी बदलण्यास मनसेच्या वरिष्ठ नेत्यांने भाग पाडल्याची चर्चा आहे. नावातील साधर्म्यामुळे पक्षाच्या उमेदवाराला त्याचा फायदा होऊ शकतो, हे ओळखूनच भाजपच्या नेत्याने ही खेळी केल्याचे सांगितले जात आहे. 

यासाठी खेळली ही खेळी...
विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून नगरसेवक रिंगणात उतरले आहेत. निकालानंतर अनेक ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. या पोटनिवडणुकीतून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी भाजपच्या या नेत्यानेच ही सर्व खेळी केली असल्याचे बोलले जात आहे.