#कारणराजकारण : राजकीय साठमारीमुळे प्रगतीला खो

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 September 2019

दौंडमध्ये स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर
दौंड शहरात नगरपालिका असूनदेखील महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही. पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. मोठ्या आजारावरील उपचारासाठी एक तर बारामती किंवा पुण्यावर अवलंबून राहावे लागते. गेल्या काही दिवसांत शहरात एकूण १४ डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. यावरून स्वच्छतेचा प्रश्‍नदेखील गंभीर असल्याचे दिसून आले.

पुणे - मुबलक पाणी, दळणवळणाच्या भरपूर सुविधा आणि पुणे शहरापासून जवळ या व अशा अनेक कारणांनी गुंतवणुकीची प्रचंड क्षमता असूनही, केवळ राजकीय साठमारीमुळे दौंड विधानसभा मतदारसंघ मागे राहिला आहे. कुरकुंभ एमआयडीसीसारखी औद्योगिक वसाहत, चौफुल्याजवळ ऑटो हब, एका बाजूला नदी, तर दुसऱ्या बाजूला वाहत्या कॅनॉलमुळे उभी राहिलेली साखर कारखानदारी असे असूनहीदेखील या मतदारसंघात बेरोजगारीचा मोठा प्रश्‍न आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहाचा अभाव, स्वच्छतेचा प्रश्‍न, अपुऱ्या आरोग्य सुविधा असे एक ना अनेक प्रश्‍न या मतदारसंघाला सध्या भेडसावत आहेत.

दौंड शहर हे रेल्वेचे मोठे जंक्‍शन म्हणून ओळखले जाते. देशभरातील रेल्वे या स्टेशनवरून ये-जा करतात. असे हे पुणे जिल्ह्यातील एक मोठे शहर. गुंतवणुकीची मोठी क्षमता या शहरात असूनही त्याचा फायदा येथील राजकीय नेतृत्वाला करून घेता आला नाही. मात्र राजकीय घडामोडीसाठीचे केंद्र एवढी मर्यादित ओळख आहे. कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीमध्ये दोनशेहून अधिक कंपन्या आहेत. 

पुणे जिल्ह्यातील मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ती ओळखली जाते; परंतु एकेकाळी दौंडसाठी वरदान म्हणून समजल्या जाणाऱ्या या ‘एमआयडीसी’मुळे शेती आणि पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य नसल्यामुळे बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणावर आहेत. ‘एमआयडीसी आम्हाला हवी आहे,’ असे तेथील मौलादिन इस्माईल शेख सांगतात. मात्र, स्थानिकांना तेथे रोजगार उपलब्ध करून दिला जात नाही, तो मिळाला पाहिजे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम कंपन्यांकडून धाब्यावर बसविले जातात, त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ‘या संदर्भात तक्रार केली, तर कारवाई होण्याऐवजी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा हप्ता वाढतो,’ अशी तक्रार शेख आणि उमेश सोनावणे यांची आहे. यापूर्वी अनेकदा याच औद्योगिक वसाहतीमध्ये दुर्घटना घडल्या. मात्र, परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा होण्यास तयार नाही, असे नवनाथ गायकवाड यांनी सांगितले.

चौफुला हेदेखील याच मतदारसंघातील एक गाव. सोलापूर महामार्गालगत हे गाव असूनदेखील तेथील अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. कालव्याला पाणी आले, तरच गावाला पाणी मिळते, असे मयूर सोडणकर यांनी सांगितले. शेतीला पुरेसे पाणी नाही, कर्जमाफीचाही लाभ मिळाला नाही, अशी तक्रार ज्ञानदेव हटे यांनी केली. शिक्षण असूनही रोजगार नाही, असे दिनेश गडदे या तरुणाने सांगितले.

‘सरकारनामा’ आणि www.esakal.com वरून ‘सकाळ’ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. आपल्यालाही यामध्ये सहभागी व्हायला आवडेल?

आपली मते मांडा 
व्हॉट्‌सॲप क्रमांक - ९१३००८८४५९
ई-मेल webeditor@esakal.com (ई-मेलचा subject: #कारणराजकारण)
फेसबुक’वर फॉलो करा fb.com/SakalNews
आपले मत ट्विट करा #कारणराजकारण हा हॅशटॅग वापरून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Daund Constituency Politics