#कारणराजकारण : विमानतळ नाहीच; रस्तेही खड्डेमय (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

खेड तालुक्‍याची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. इथे होणारे विमानतळ तर राजकीय नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे दुसरीकडे गेलेच, पण ज्या खेडला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न दाखवले, तिथल्या रस्त्यांवरचे साधे खड्डे बुजविणेही इथल्या राजकीय नेत्यांना जमलेले नाही.

खेड तालुक्‍याची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. इथे होणारे विमानतळ तर राजकीय नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे दुसरीकडे गेलेच, पण ज्या खेडला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न दाखवले, तिथल्या रस्त्यांवरचे साधे खड्डे बुजविणेही इथल्या राजकीय नेत्यांना जमलेले नाही.

हुतात्मा राजगुरू यांचा वारसा असलेले राजगुरुनगर, अर्थातच खेड! भामा आसखेड धरण, हुतात्मा राजगुरू वाड्याची डागडुजी, चाकणचे विमानतळ, एमआयडीसी अशी अनेक स्वप्न पाहिलेला हा खेड तालुका सर्वच दृष्टीने चर्चेत राहिला. चाकणचे विमानतळ हे तर खेडचे सर्वांत सुंदर स्वप्न राजकीय नेत्यांच्या दुटप्पी धोरणामुळे अक्षरशः उधळून लावले गेले. विमानतळ तर सोडाच, पण इथले रस्तेदेखील खड्ड्यात गेले आहेत. जड वाहनांची इथे असलेली वाहतूक पाहता, इथले रस्ते ज्या प्रतीचे असायला हवे तसे नाहीत. 

शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरे यांनी केलेल्या विकास कामांबाबत नागरिकांमध्ये प्रश्‍न आहेत, तर दुसरीकडे या तालुक्‍यात दहा वर्षांची कारकीर्द लाभलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्याबद्दलही समाधानकारक मते नाहीत. आयत्या वेळी उमेदवारी मिळाल्याने सुरेश गोरे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले आणि निवडूनही आले. परंतु, मोठे- मोठे प्रकल्प असलेल्या खेडमध्ये अद्याप समाधानकारक विकास झालेला पाहायला मिळत नाही. 

दुसरीकडे प्रलंबित असलेल्या मोबदल्याच्या प्रश्‍नासाठी आजही भामा आसखेड प्रकल्पग्रस्त लढा देत आहेत. जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम न देता जमीनच द्यावी, अशी या प्रकल्पग्रस्तांची मागणी होती. मात्र, ही मागणी पूर्ण झालेली नाही आणि कुठल्याही राजकीय नेत्याने मध्यस्थी करत त्यांचा हा प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्नही केलेला नाही. या धरणातून पूर्व पुण्याला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

हुतात्मा राजगुरू यांच्या ऐतिहासिक वाड्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने ८४ कोटींचा विकास आराखडा तयार केला. प्रत्यक्षात मात्र सागवान लाकडामध्ये उभा राहिलेला थोरला वाडा, राजगुरू यांची जन्मखोली या व्यतिरिक्त कोणतेही नूतनीकरण झालेले नाही. विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त वाचनालय, मोठी दगडी भिंत, उद्याने, स्मारके हे काम अजूनही अपूर्णच आहे.

ज्या वेळी प्रकल्पासाठी भूसंपादन केले, तेव्हा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला . काही जणांनी जमिनीच्या मोबदल्यात जमिनीची मागणी केली. काहीची ही मागणी पूर्ण झाली. मात्र, सर्वांची मागणी पूर्ण होईपर्यंत पूर्व पुण्याला पोचणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील १ किलोमीटरचे काम आम्ही होऊ देणार नाही. तसेच १५ टक्के धरणसाठा राखीव ठेवावा, अशीही मागणी आम्ही केली आहे. 
- सत्यवान नवले, उपसरपंच, वहागाव

हुतात्मा राजगुरूंच्या राष्ट्रीय स्मारकाचा भव्य आराखडा तयार आहे. अंदाजपत्रक तयार आहे. संपादित कराव्या लागणाऱ्या इमारती व जागांचे मूल्यांकन झालेले आहे. अधिकारी आणि संबंधित मंत्र्यांच्या बैठका झाल्या आहेत. फक्त निधीची तरतूद होत नाही, एवढीच खंत आहे. या निवडणुकीनंतर येणाऱ्या सरकारकडून निधी मिळेल, अशी आशा आहे. 
- सुशील मांजरे, सचिव, हुतात्मा राजगुरू स्मारक समिती

‘सरकारनामा’ आणि www.esakal.com वरून ‘सकाळ’ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. आपल्यालाही यामध्ये सहभागी व्हायला आवडेल?

आपली मते मांडा 
व्हॉट्‌सॲप क्रमांक - ९१३००८८४५९
ई-मेल webeditor@esakal.com (ई-मेलचा subject: #कारणराजकारण)
फेसबुक’वर फॉलो करा fb.com/SakalNews
आपले मत ट्विट करा #कारणराजकारण हा हॅशटॅग वापरून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Khed Constituency Airport Road Issue