esakal | ...तर आघाडीच्या आणखी चार जागा वाढल्या असत्या
sakal

बोलून बातमी शोधा

VidhanSabha Election analysis by Sambhaji Pawar for Pune District

भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीला "जोर का धक्का' देत पुणे जिल्ह्यात पहिल्या स्थानावर आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीला दौंड, शिवाजीनगर, खडकवासला आणि पुणे कॅन्टोंमेंट या चार जागांवर अवघ्या पाच हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव पत्करावा लागला. जर आघाडीच्या नेत्यांनी या जागांवर आणखी थोडा जोर लावला असता तर या चार जागांची भर आघाडीच्या खात्यात पडली असती.

...तर आघाडीच्या आणखी चार जागा वाढल्या असत्या

sakal_logo
By
संभाजी पाटील @psambhajisakal

पुणे : भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीला "जोर का धक्का' देत पुणे जिल्ह्यात पहिल्या स्थानावर आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीला दौंड, शिवाजीनगर, खडकवासला आणि पुणे कॅन्टोंमेंट या चार जागांवर अवघ्या पाच हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव पत्करावा लागला. जर आघाडीच्या नेत्यांनी या जागांवर आणखी थोडा जोर लावला असता तर या चार जागांची भर आघाडीच्या खात्यात पडली असती.

भाजपलाही इंदापूर आणि हडपसरचा पराभव असाच अल्पमताधिक्‍यामुळे रुखरुख लावणारा ठरला आहे. गेल्या पाच वर्षात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातही वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या भाजपला या विधानसभा निवडणुकीत आपल्या जागा वाढतील अशी अपेक्षा होती. भाजपच्या या अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसने धुळीस मिळविल्या. 2014 मध्ये भाजपकडे रासपची एक धरून 13, शिवसेनेकडे तीन, राष्ट्रवादीकडे तीन आणि मनसेकडे आणि कॉंग्रेसकडे एक जागा होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीने नऊ, कॉंग्रेसने दोन जागा जिंकल्या तर भाजपला 9 जागांवरच समाधान मानावे लागले. ज्या नऊ जागा आल्या त्यातही चार जागांवरचा विजय हा निसटता आहे.

दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल हे फक्त 746 मतांनी विजयी झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतचा सर्वांत निसटता विजय म्हणून त्याची नोंद झाली आहे. दौंडची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. पण, कुल यांचा वैयक्‍तिक करिष्मा कामी आला. या मतदारसंघात नोटाला 917 मते मिळाली आहे. तर, वंचित आघाडीच्या उमेदवाराला 2 हजार 633 मते मिळाली. मतांचा टक्का आणखी थोडा वाढला असता तर या मतदारसंघात काहीही होऊ शकले असते. खडकवासला मतदारसंघात विजयी उमेदवार भाजपचे भीमराव तापकीर यांचे मताधिक्‍य आहे 2 हजार 595 मतांचे. या मतदारसंघात नोटाची मते 3 हजार 561 आहेत. या मतदारसंघातही भाजपला वंचितने साथ दिली असे म्हणावे लागेल. वंचित आघाडीला येथे 5 हजार 931 मते मिळाली आहेत.
शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे 5 हजार 124 मतांनी विजयी झाले. कॉंग्रेसचे दत्ता बहिरट यांनी पक्षातील अनेक जण सोडून गेल्यानंतरही या मतदारसंघात जोरदार टक्कर दिली. या मतदारसंघात मनसे फारशी चालली नाही, उलट वंचित आघाडीच्या उमेदवाराने दहा हजारापेक्षा जास्त मते घेतल्याने भाजपचा विजय सुकर केला.

पुणे कॅन्टोंमेंट मध्ये कॉंग्रेसचे रमेश बागवे यांचा भाजपच्या सुनील कांबळे यांनी 5 हजार 12 मतांनी पराभव केला. येथे वंचित आघाडीने घेतलेल्या दहा हजार आणि एमआयएमला मिळालेल्या सहा हजार मतांनी बागवे यांचा विधानसभेचा रस्ता रोखणारी ठरली. इंदापुरात हर्षवर्धन पाटील अवघ्या 3 हजार 110 तर हडपसरमध्ये योगेश टिळेकर 2 हजार 820 पराभूत झाले. प्रथमच जिल्ह्यात एवढ्या अटीतटीच्या लढती पहायला मिळाल्या.

loading image