आंबेगावच्या कन्येचा जलतरणात विक्रमी ‘सूर’

आंबेगावच्या कन्येचा जलतरणात विक्रमी ‘सूर’
Published on

मंचर, ता. १९ : आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी-अवसरी खुर्द येथील विधी नंदकुमार भोर (वय १३) हिने जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिने धामणतर जेटी ते अटल सेतू हे तब्बल ४२ किलोमीटर अंतर अवघ्या ७ तास ३२ मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण करत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विधीला सन्मानित करण्यात आले. हा सन्मान निशांत भगत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विधीला लहानपणापासूनच जलतरणाची विशेष आवड असून ती सध्या मुंबईतील सानपाडा येथे वास्तव्यास आहे. तिचे प्रशिक्षण डोंबिवली येथील रूपाली रेपाळे स्विमिंग ॲकॅडमीमध्ये सुरू आहे.
सोमवारी पहाटे २ वाजून २२ मिनिटांनी विधीने खाडीतून आपल्या जलतरण मोहिमेला सुरुवात केली. अथक प्रयत्न आणि जिद्दीच्या बळावर तिने अटल सेतू परिसरात ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. विधीचे वडील नंदकुमार भोर हे शेतकरी कुटुंबातील असून सध्या कुटुंब नवी मुंबईत वास्तव्यास आहे. विधी वाशी येथील फादर अँग्नेल स्कूलसध्या इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे.
तिच्या या यशाबद्दल माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

‘‘धामणतर जेटी ते अटल सेतू हे ४२ किलोमीटर अंतर पूर्ण करणे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते. समुद्रातील लाटा, थकवा आणि सातत्य टिकवणे कठीण होते. मात्र प्रशिक्षक रूपाली रेपाळे यांचे मार्गदर्शन, आईवडिलांचा पाठिंबा आणि स्वतःवरील विश्वासामुळे मी ही मोहीम पूर्ण करू शकले. पुढेही देशासाठी मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवण्याचे माझे स्वप्न आहे.’’
–विधी नंदकुमार भोर, जलतरणपटू, भोरवाडी अवसरी खुर्द (ता. आंबेगाव)

Marathi News Esakal
www.esakal.com