‘विद्यावाणी’ आता मोबाईल ॲपवर

मीनाक्षी गुरव
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘विद्यावाणी’ या कम्युनिटी रेडिओवरील थेट प्रसारण आता श्रोत्यांना ‘मोबाईल ॲप’द्वारे ऐकता येणार आहेत. त्यामुळे केवळ विद्यार्थी आणि नागरिकांनाच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या नागरिकांनादेखील ‘विद्यावाणी’वरील कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.

विद्यापीठातील ‘विद्यावाणी’ हे एफएम रेडिओ केंद्र जून २००५ मध्ये कार्यान्वित झाले. त्या वेळी या कम्युनिटी रेडिओवर केवळ दोन तास कार्यक्रम प्रसारित होत असे. मात्र, आता या रेडिओद्वारे जवळपास ११ तास कार्यक्रम प्रसारित केले जात आहेत. विद्यापीठापासून १५ किलोमीटरपर्यंतच्या परिसरात सध्या ‘विद्यावाणी’वरील कार्यक्रम ऐकू येत आहेत. आता हे कार्यक्रम ‘विद्यावाणी १०७.४ एफएम’ या मोबाईल ॲपद्वारे अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोचणार आहेत.

या कार्यक्रमाचे थेट प्रसारण गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून होत आहे. या कम्युनिटी रेडिओची प्रसारण क्षमता वाढविण्यासाठी ट्रान्समिटिंग टॉवर हलविण्याचा विचार सुरू आहे, असे ‘विद्यावाणी’चे मानद संचालक आनंद देशमुख यांनी सांगितले.

परदेशातून वाढता प्रतिसाद
हॅलो, मी सॅन फ्रॉन्सिस्कोमधून बोलतोय. नुकतेच ‘विद्यावाणी’चे थेट प्रसारण ऐकले खूप छान वाटले. पुण्यापासून खूप दूर असलो, तरीही अगदी घरात असल्यासारखं वाटलं, असा अनुभव सांगणारा एक फोन आला आणि मन सुखावले. ‘विद्यावाणी’ला नवे रूप देण्याच्या प्रयत्नाला यश येत असल्याचे समाधान मिळाले, असा अनुभव विद्यापीठाच्या कम्युनिटी रेडिओचे (विद्यावाणी) मानद संचालक आनंद देशमुख यांनी सांगितला. इंटरनेट आणि मोबाईल ॲपद्वारे ‘विद्यावाणी’चे कार्यक्रम ऐकणाऱ्या परदेशातील नागरिकांचे फोन गेल्या काही दिवसांत वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Vidyawani on Mobile App