बारामती इंदापूरमध्ये एकनाथ शिंदेसाठी विजय शिवतारे सक्रीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay shivtare

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता एकनाथ शिंदे गटाच्या वतीने बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटाच्या विस्तारीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

बारामती इंदापूरमध्ये एकनाथ शिंदेसाठी विजय शिवतारे सक्रीय

बारामती - राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता एकनाथ शिंदे गटाच्या वतीने बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटाच्या विस्तारीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या बाबत पुढाकार घेतला आहे.

याबाबत विजय शिवतारे हे शनिवारी (ता. 5) बारामती व इंदापूर तालुक्याचा दौरा करणार आहेत. सकाळी अकरा वाजता इंदापूर विश्रामगृहात ते कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेणार असून त्यानंतर दुपारी चार वाजता बारामती शहरातील हॉटेल कृष्णसागर येथे कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदही घेणार आहेत.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच बारामती दौरा केला होता. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असे दोन्ही पक्ष आपापल्या पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुका बाबत देखील दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून पक्ष बांधणी सुरू केली आहे.

याच पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघ हे भाजप व शिवसेनेचे आगामी लक्ष्य असून याबाबत बाळासाहेबांच्या शिवसेनेची काय भूमिका असेल हेही या निमित्ताने सर्वांसमोर येईल. विजय शिवतारे याबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका या निमित्ताने स्पष्ट करुन भाजप व बाळासाहेबांची शिवसेना एकत्रित निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार याबाबतही विजय शिवतारे या निमित्ताने खुलासा करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विजय शिवतारे यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती, आता विजय शिवतारे यांनी बारामतीवर लक्ष केंद्रीत करण्याचे संकेत दिले आहेत.