esakal | Video : दोन आठवड्यानंतर विजय शिवतारेंना डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay-Shivtare

हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी गाडीतूनच फेसबुक लाईव्हद्वारे शिवसैनिक, चाहते आणि हितचिंतकांशी संवाद साधला. 

Video : दोन आठवड्यानंतर विजय शिवतारेंना डिस्चार्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे यांना मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमधून आज (रविवार) डिस्चार्ज देण्यात आला. ब्लाॅकेज झाल्याने नुकतीच त्यांच्यावर अँन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जवळपास दोन आठवडे हृदय आणि किडनीच्या आजाराशी शिवतारेंनी यशस्वी झुंज दिली.

हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी गाडीतूनच फेसबुक लाईव्हद्वारे शिवसैनिक, चाहते आणि हितचिंतकांशी संवाद साधला. यावेळी गुंजवणी प्रकल्पातील जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

दरम्यान या कालावधीत आलेले अनेक अनुभवही त्यांनी या व्हिडीओद्वारे कथन केले. सासवड येथील उपोषणामुळे आधीच त्यांना किडनीचा त्रास होत होता. त्यामुळे हृदय शस्त्रक्रियेबाबत निर्णय घ्यायला डॉक्टरांना अडचणी येत होत्या. शस्त्रक्रिया करण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्यानंतर शस्त्रक्रियेच्या आदल्या रात्री त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मतदार संघातील जनतेसाठी दोन गोपनीय पत्रे लिहून ठेवल्याचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. त्यावेळी ते भावूक झाले होते. आता बरे वाटत असल्याने मंत्रालयातील महत्त्वाची कामे आटोपून आपण लवकरच मतदारसंघात जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

'विजय शिवतारे लवकरच सासवडला येणार आहेत. त्यानंतर ते भेटण्यासाठी सर्वांसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये,' अशी माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी दिली.

loading image
go to top