विजयस्तंभ अभिवादन सोहळा सर्वांनी मिळून यशस्वी करावा - डॉ. राजेश देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Rajesh Deshmukh

कोरेगाव भीमाजवळील पेरणे फाटा येथे येत्या १ जानेवारीला आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा सर्व सरकारी यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा.

Vijaystambh Sohala : विजयस्तंभ अभिवादन सोहळा सर्वांनी मिळून यशस्वी करावा - डॉ. राजेश देशमुख

पुणे - कोरेगाव भीमाजवळील पेरणे फाटा येथे येत्या १ जानेवारीला आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा सर्व सरकारी यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी (ता.२७) सर्व सरकारी यंत्रणांना दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, या कार्यक्रमादरम्यान स्वच्छतेची चांगली सुविधा उपलब्ध असावी. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे.आरोग्य विभागाच्यावतीने सर्वांना मास्क वाटप करावे. शौचालयांची नियमित स्वच्छता होईल आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील, याकडे विशेष लक्ष द्यावे. कार्यक्रमाच्या दिवशी सर्व संबंधित यंत्रणांनी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे.’’

यासाठी दीड हजार शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी १५० अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवण्यात येणार आहेत. शिवाय २१ आरोग्य पथके स्थापन करण्यात आली असून, या पथकांमध्ये २४० कर्मचारी, ४१ रुग्णवाहिका, बाईक ॲम्ब्युलन्स, ३८ घंटागाडी, १० अग्निशमन वाहन आणि १७५ कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आले.