
तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्यातील पारोडी- शिवतक्रार म्हाळुंगी या छोट्या गावातील विकास काशिनाथ शिवले या सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अॅड. अशोक पवार यांनी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदावर संधी दिली आहे. त्यांच्या वडिलांनी सालकरी म्हणून काम केले होते.
महाराष्ट्रात सन १९७२ मध्ये दुष्काळ पडला होता. याच काळात विकास शिवले यांचे वडील काशिनाथ शिवले यांनी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दत्तोबा तुकाराम तुपे यांच्याकडे सालकरी म्हणून हडपसर येथे अनेक वर्ष काम केले. त्यानंतर त्यांनी गावातील तुटपुंजी शेती विकसित केली. आपला मुलगा भविष्यात समाजिक व राजकीय जीवनात मोठा होईल, याची किंचितही विचार त्यांनी कधी केला नाही. मात्र, त्यांचा मुलगा उपसभापती झाला. त्याचा आनंद त्यांना झाला. विकास शिवले यांच्या मोठ्या बंधूने सैन्यदलात १६ वर्ष सेवा केली आहे.
शिवले यांच्या गावची लोकसंख्या जेमतेम अडीच हजारापर्यंत आहे. यापूर्वी याच गावचे सुपुत्र पोपटराव कोकरे यांनी आमदार म्हणून तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर तब्बल ४ दशकानंतर विकास शिवले यांच्या रुपाने बाजार समितीचे उपसभापती म्हणून कार्य करण्याची संधी गावाला मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ समाधानी आहेत. शिवले यांनी यापूर्वी गावचे सरपंचपद भूषविले असून, त्यांना जिल्हा परिषदेने आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच, सकाळ मध्यम समूहा"तर्फेही त्यांना सन्मानित केले आहे. सध्या ते धर्मवीर संभाजी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच, गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व सहकारी दूध सस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी वीटभट्टीचा व्यवसाय सुरु केला.
शिवले हे भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमधून बाजार समितीवर निवडून आले आहेत. त्यांनी भाजपच्या सरपंच आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. वीट व्यवसाय त्यांनी चिकाटीने केला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार अशोक पवार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळून, सर्वांना बरोबर घेऊन मताधिक्य वाढविण्यात मदत केली. निष्ठेने काम केल्याचे फळ आमदार अशोक पवार यांनी उपसभापतिपदाच्या रुपात त्यांना दिले आहे. आगामी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा नक्कीच उपयोग होईल, असे राजकीय गणित आहे.
कोरोनाचे संकट असले, तरी आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन, शेतकरी हिताचे निर्णय घेऊन बाजार समितीचा उत्कृष्ट कारभार करणार असल्याचे निवडीनंतर शिवले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.