पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विलास कानडे यांची निवड

राज्य सरकारने जकात रद्द करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय
vilas kanade
vilas kanadesakal

पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख व सह आयुक्त विलास कानडे यांची राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी निवड केली. ज्ञानेश्‍वर मोळक यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर कानडे यांना बढती देऊन नियुक्त करण्यात आले आहे. पुणे महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांच्या जागा आहेत, त्यापैकी दोन ठिकाणी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, तर एका अतिरिक्त आयुक्तपद महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते.

विलास कानडे यांना पुणे महापालिकेत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. राज्य सरकारने जकात रद्द करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तेव्हा जकात विभाग प्रमुख असलेल्या विलास कानडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही सतत संवाद व चर्चा करून त्यांनी एलबीटीची यशस्वी अंमलबजावणी केली होती.

त्याच प्रमाणे केंद्र सरकारने ‘जीएसटी’ लागू करताना एलबीटी रद्द होणार असे सांगितले. त्याबदल्यात गेल्या पाच वर्षातील सर्वोच्च उत्पन्न असलेली रक्कम आधार मानून त्यानुसार दरवर्षी रक्कम देण्याचा निर्णय घेतला. एलबीटीमध्ये कानडे यांनी सर्वोच्च उत्पन्न मिळाल्याने आता जीएसटीचा निधी मोठा मिळत आहे. तसेच मिळकतकर विभागातही सर्वोच्च उत्पन्न कानडे यांच्या कालावधीतच प्राप्त झाले आहे.

‘‘विभागीय उपायुक्त, सहाय्यक आयुक्त म्हणून ज्या ज्या ठिकाणी काम केले तेथे महापालिकेच्या हिताचा विचार केला. जकात, एलबीटी आणि मिळकतकर या तिन्ही कर प्रणालीत काम करता आले. आता अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारीही त्याच क्षमतेने पार पाडली जाईल.’’

- विलास कानडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com