विलास लांडे यांचा ७७ हजारांनी पराभव | Election Results 2019

पीतांबर लोहार 
Friday, 25 October 2019

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी तब्बल ७७ हजार ५६७ मतांनी विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत अपक्ष माजी आमदार विलास लांडे यांचा पराभव झाला. त्यामुळे मतदारसंघ २००८ मध्ये अस्तित्वात आल्यापासून अपक्षांना विजयी करणाऱ्या मतदारसंघात लांडगे यांच्या रूपाने अखेर भाजपचे ‘कमळ’ अधिकृतपणे फुलले.

पिंपरी -  मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेले महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी तब्बल ७७ हजार ५६७ मतांनी विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत अपक्ष माजी आमदार विलास लांडे यांचा पराभव झाला. त्यामुळे मतदारसंघ २००८ मध्ये अस्तित्वात आल्यापासून अपक्षांना विजयी करणाऱ्या मतदारसंघात लांडगे यांच्या रूपाने अखेर भाजपचे ‘कमळ’ अधिकृतपणे फुलले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये गुरुवारी (ता. २४) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीतच लांडगे यांनी चार हजार ३९३ मतांची आघाडी घेतली होती. त्यांना आठ हजार ४८१ आणि लांडे यांना चार हजार ९४ मते मिळाली होती. अन्य १० उमेदवारांपैकी कोणीही साडेतीनशेपेक्षा अधिक मते मिळविली नव्हती. लांडगे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवत विजयश्री खेचून आणली. ४११ मतदान केंद्रांसाठी २० टेबलांवर मतमोजणी झाली. त्याच्या २१ फेऱ्या झाल्या. टपाली मतदानामध्येही लांडगे यांची आघाडी होती. ५७६ टपाली मतपत्रिका होत्या. त्यापैकी ४९१ मते वैध व ८५ अवैध ठरली. लांडगे यांना २७५ आणि लांडे यांना १८५ मते मिळाली. १७ जणांनी ‘नोटा’चा अधिकार वापरला. 

शेवटच्या टप्प्यात मोठी आघाडी
सकाळी साडेअकराच्या सुमारास आठव्या फेरीची माहिती दिली. त्याअखेर महेश लांडगे यांना तीस हजार ७४४ मतांची आघाडी मिळाली होती. त्यांना ६४ हजार ५३५ आणि विलास लांडे यांना ३३ हजार ७९१ मते मिळाली होती. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने तेरावी फेरी संपलेली होती. काही टेबलांवर चौदाव्या, तर काही टेबलांवर पंधरावी फेरी सुरू होती. या वेळी  लांडगे यांनी तब्बल ४३ हजारांची आघाडी घेतलेली होती.

लांडेंच्या प्रतिनिधींचे ‘वॉकआउट’
मतमोजणी कक्षातील प्रत्येक टेबलजवळ महेश लांडगे आणि विलास लांडे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. फेरीनिहाय मते ते लिहून घेत होते. तेराव्या फेरीअखेर लांडगे यांना ४३ हजारांची आघाडी पाहून लांडे यांच्या प्रतिनिधींनी काढता पाय घेतला. शेवटच्या चार फेऱ्यांच्या वेळी केवळ लांडगे यांचेच प्रतिनिधी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vilas Lande loss of 77 thousands