'मुख्यमंत्र्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवावे!'

ब्रिजमोहन पाटील
Monday, 26 October 2020

आदेशातील शब्दांचा चुकीचा अर्थ काढून तरुणांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचे काम मंत्रालयातील काही मंत्री आणि प्रशासनातील काही अधिकारी करत आहेत. त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बळी पडत आहेत.

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे केवळ पोकळ घोषणा आहेत. मराठा समाजाला दिलेले आरक्षण त्यांना टिकवता आले नाही, ज्यांची निवड प्रक्रियेतून नोकरीसाठी निवड झाली, त्यांना अद्याप शासकीय नोकरीचा लाभ झालेला नाही. उद्धव ठाकरे यांनी केवळ बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाखवावे, अशी टीका शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी झालेल्या नोकरभरतीतील उमेदवारांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसंग्रामच्यावतीने म्हात्रे पूल येथील कृष्णसुंदर गार्डन येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विनायक मेटे बोलत होते.

यंदा नवरात्रीत वाहन खरेदी घटली, पण चारचाकीची विक्री 'टॉप गिअर'मध्ये!​

''मराठा आरक्षणाला स्थगिती येण्यापूर्वी जानेवारी 2019 ते मार्च 2020 या कालावधीत 20 विभागांनी नोकरभरती प्रक्रिया राबवली. 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यावर सरकारने सर्व विद्यार्थ्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. निवड झालेल्या सुमारे चार हजार विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय उद्धव ठाकरे सरकारने केला आहे. आदेशातील शब्दांचा चुकीचा अर्थ काढून तरुणांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचे काम मंत्रालयातील काही मंत्री आणि प्रशासनातील काही अधिकारी करत आहेत. त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बळी पडत आहेत,'' अशी टीकाही मेटे यांनी केली.

पुणे : उद्यानांबाबत महापौर मोहोळ यांचा मोठा निर्णय; वाचा काय म्हणाले महापौर​

अशोक चव्हाण दुफळी निर्माण करतात
अशोक चव्हाण यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही, ते दुफळी निर्माण करण्याचे काम करत आहेत, त्याला मराठा समाजाने बळी पडू नये, अशी टीका मेटे यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि निवड झालेल्या तरुणांना नोकरीत सामावून घेण्यासाठी सरकारने बैठक घेतली नाही, तर याविरोधात राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्याकडे दाद मागितली जाईल. तरीही यातून न्याय मिळाला नाही, तर शिवसंग्राम आझाद मैदानावर धरणे धरेल, असा इशारा मेटे यांनी दिला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinayak Mete criticized Chief Minister Uddhav Thackerays speech at Dussehra Melava