'व्हिआयपी' दौऱ्यासह विविध कारणामुळे पुणेकर अडकले वाहतुक कोंडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune traffic

पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने आगोदरच वाहतुक संथ गतीने सुरु आहे.

'व्हिआयपी' दौऱ्यासह विविध कारणामुळे पुणेकर अडकले वाहतुक कोंडीत

पुणे - एरवी चांदणी चौक किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुक कोंडीचा त्रास सगळ्यांना होतो. शनिवारी मात्र शहराचा मध्यवर्ती भागासह या भागाला जोडणाऱ्या आठ ते दहा प्रमुख रस्ते, त्यांना जोडणारे अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याने नागरीक अक्षरशः त्रस्त झाले. 10-15 मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांवर तासभर वाहतुक कोंडीमध्ये काढण्याची वेळ आली. व्हिआयपी दौरे, बंद पडलेल्या बस, मेट्रोचे काम, पाऊस, वाहतुक पोलिसांचा अभाव, शनिवारच्या सुट्टीची गर्दी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतुक कोंडीमध्ये जसजशी भर पडत गेली, तसतसा वाहनचालकांचा संताप वाढत गेल्याची सद्यस्थिती होती.

शहरामध्ये मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने आगोदरच वाहतुक संथ गतीने सुरु आहे. मात्र शनिवारी सुट्टीचा दिवस असतानाही सकाळपासूनच प्रमुख रस्ते, चौकांमध्ये मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याचे चित्र होते. औंध ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बाणेर ते विद्यापीठ, पुढे विद्यापीठ शिवाजीनगर या रस्त्यांवर सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाहनांची गर्दी होती. वाहतुक संथ गतीने सुरु होती.

दरम्यान, नदीपात्रामधील विसर्ग कमी झाल्याने शनिवारी दुपारी भिडे पुलावरील वाहतुक सुरु झाल्याने वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र सायंकाळी पाच वाजल्यापासून शहरात पुन्हा वाहतुक कोंडी होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही पुण्यात विविध ठिकाणी कार्यक्रम होते. त्यामुळे रात्री स्वारगेट ते कृषी महाविद्यालय व कोथरुड ते विमानतळ या मार्गावरुन "व्हिआयपी' जाणार असल्याने ठिकठिकाणी काही वेळ वाहतुक थांबविण्यात आली. त्यामुळे जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या.

महापालिका, कॉंग्रेस भवन ते बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणीही वाहतुक कोंडी झाली. त्याच पद्धतीने जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरही वाहतुक कोंडी झाल्याने बहुतांश नागरीकांनी पेठांमधील अंतर्गत रस्ते, डेक्कन, आपटे रस्ता, घोले रस्ता, प्रभात रस्ता, डेक्कन नदीपात्र, विधी महाविद्यालय रस्ता या मार्गाने इच्छितस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. त्यातच ठिकठिकाणी बस बंद पडणे, शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर वाढलेली गर्दी, दुहेरी पार्कींग, प्रमुख चौकांमध्ये वाहतुक पोलिसांचा अभाव अशा कारणांमुळे वाहतुक कोंडीमध्ये आणखीनच भर पडत गेली.

दरम्यान, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, कात्रज, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, दांडेकर पुल, सिंहगड रस्ता या ठिकाणीही वाहतुक कोंडी झाली. तर जुना मुंबई पुणे महामार्गावर बोपोडी ते अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याच पद्धतीने येरवड्यापासून, विमानतळ परिसर, रामवाडी, वडगाव शेरी, वाघोलीपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. एकूणच शनिवारी सुट्टीच्या दिवशी घरी लवकर जाण्यासाठी निघालेल्या वाहनचालकांचा हिरमोड झाला. नागरीकांना पाच ते दहा मिनीटांचे अंतर कापण्यासाठी अक्षरशः एक तासाहून अधिक वेळ लागल्याने नागरीकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता.

फडणवीसांनाही वाहतुक कोंडीचा फटका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वाहतुक कोंडीचा फटका बसला. एमआयटी येथील कार्यक्रम झाल्यानंतर फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरुन विमानतळाकडे जात होता. त्यावेळी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याने फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा देखील वाहतुक कोंडीपासून सुटू शकला नाही. पोलिसांनी तत्काळ वाहतुक सुरळीत करुन मार्ग मोकळा करुन दिला.

'शनिवारी व्हिआयपी दौरे होते. तसेच बस बंद पडणे, शनिवारची पादचाऱ्यांची गर्दी, दुहेरी पार्कींग, पाऊस, खड्डे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतुक कोंडी झाली होती. वाहतुक पोलिस ठिकठिकाणी नियुक्त केले होते. वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु होते.'

- चंद्रकांत सांगळे, सहाय्यक पोलिस आयुक्त

'मी जंगली महाराज रस्त्यावरुन डेक्कन मार्गे कोथरुडला जात होतो. सायंकाळी सात वाजता बालगंधर्व रंगमंदिर परिसरात आलो. तेव्हा, तेथून पुढे जाण्यासाठी माझा पाऊणतास वेळ वाया गेला.'

- विजय कांबळे, नोकरदार.

पुणे दिल्लीप्रवासापेक्षा विमानतळ ते विधी महाविद्यालय रस्ता या प्रवासाला वेळ

शहराच्या मध्यवर्ती भागासह विमानतळ परिसरातही शनिवारी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. परिणामी अनेक नागरीकांना या वाहतुक कोंडीचा फटका बसला. नागरीकांनी फेसबुक, ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त केला. एका नागरीकाने "पुणे दिल्ली प्रवासासाठी जितका वेळ लागत नाही, तितका वेळ विमानतळ ते विधी महाविद्यालय रस्त्यावर जाण्यासाठी वेळ लागतो. फारच वाईट ट्रॅफीक' अशा शब्दात नागरीकांनी आपला राग व्यक्त केला.

Web Title: Vip Tour Pune Citizens Stuck In A Traffic Jam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punetourviptraffice