विरोधी गटाचे 'ते' एकमेव संचालक अन् तेच झाले चेअरमन

प्रफुल्ल भंडारी
Monday, 14 September 2020

दौंड तालुक्यातील ९० वर्ष जुन्या प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विरोधी गटातील एकमेव निवडून आलेले संचालक विश्वनाथ कौले हे चुरशीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील ९० वर्ष जुन्या प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विरोधी गटातील एकमेव निवडून आलेले संचालक विश्वनाथ कौले हे चुरशीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विद्यमान राज्य सरचिटणीस तथा पतसंस्थेचे माजी चेअरमन अप्पासाहेब कुल यांचे वर्चस्व या निवडीमुळे मोडीत निघाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

३ सप्टेंबर १९३० रोजी स्थापन झालेल्या दौंड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सन २००१ नंतर कर्मयोगी सुभाषअण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था असे नामांतर करण्यात आले. पतसंस्थेच्या जुलै २०१६ मध्ये पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अप्पासाहेब कुल यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिक्षक प्रगती पॅनेलने १७ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या. तर विरोधी स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलने विश्वनाथ कौले यांच्या रूपाने फक्त एक जागा जिंकली होती. मागील चार वर्षात ठराविक सत्ताधारी आणि संस्थेतील एकाधिकारशाही विरूध्दची खदखद यंदा चेअरमन निवडीच्या निमित्ताने पुढे आली.

चेअरमनदापासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत विश्वनाथ पांडुरंग कौले यांना १० तर त्यांचे प्रतिस्पर्धी संदीप विश्वनाथ होले यांना सात मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी काम पाहिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नूतन चेअरमन विश्वनाथ कौले हे २७ वर्षापासून अध्यापन करीत असून दौंड पंचायत समितीकडून सन २००५ मध्ये त्यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते विश्वनाथ कौले यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ८५० असून भांडवल १५ कोटी तर कर्जवाटप २१ कोटी रूपये इतके आहे. मासिक पगारानुसार १६ लाख रूपयांपर्यंत सभासदांना कर्ज दिले जाते.  

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishwanath Kaule as the Chairman of Primary Teachers Co-operative Credit Union