
बी. के. मोमीन कवठेकर यांना विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य ढोलकी फडमालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रघूवीर खेडकर यांनी माहिती दिली. मुंबई येथे या पुरस्काराची घोषणा शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांनी नूकतीच केली.
पडद्याआड तर कधी पडद्यापुढे आत्मविश्वासाने वावरलेले अष्ठपैलु लोककलावंत मोमीन कवठेकर यांनी आजपर्यंत गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारात विपुल असे लिखाण केले आहे. त्यांच्या लिखाणाचा अभ्यास करून पुणे विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे. मोमीन कवठेकरांनी लोककलावंतावर लिहिलेले पुस्तक संदर्भ म्हणून अभ्यासकांकडून वापरले जाते. मोमीन कवठेकरांचा सन्मान म्हणजे पन्नास वर्षांच्या साहित्यिक प्रवासात चार हजारांहून अधिक गीते लिहून लोककलेला संपन्न करणाऱ्या अवलियाला मिळालेली ही पोचपावतीच म्हणावी लागेल. लंगड मारतय उडून तंगड..चे... हे त्यांचे गीत संगीतकार दत्ता महाडीक पुणेकर यांनी अजरामर केले.
गण, गवळण, लावण्या, भावगीते, भक्तिगीते, भारूडे, सद्यस्थिती वर्णन करणारी लोकगीते, पोवाडे, कविता, बडबडगीते, कलगीतुरा, देशभक्तिपर गीते, मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन, मराठी गाण्यांच्या अल्बमसाठी लेखन, जनजागृती करणारी गीते त्यांची प्रसिद्ध झाली आहेत. आकाशवाणीवर हुंडाबंदी, व्यसनबंदी, एड्स, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, साक्षरता अभियान यावर लोकनाट्य प्रसारीत झालेली आहेत. भंगले स्वप्न महाराष्ट्रा, भक्त कबीर, सुशीला मला क्षमा कर, बाईन दावला इंगा, इष्कान घेतला बळी, तांबड फुटल रक्ताच ही वनाट्य त्यांनी लिहली आहेत. वेडात मराठे वीर दौडले सात, लंका कुणी जाळली, भंगले स्वप्न महाराष्ट्राचे ऐतिहासिक नाटके लिहली. प्रेमस्वरूप आई हा त्यांचा कवीता संग्रह प्रसिद्ध आहे. नेताजी पालकर नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका, भ्रमाचा भोपऴा नाटकात तृतीयपंथीयाची भुमिका, भंगले स्वप्न महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची भुमिका त्यांनी साकारली. रामायण कथा, अष्टविनायक गीते, नवसाची येमाई - भाग एक व भाग दोन, सत्वाची अंबाबाई, वांग्यात गेली गुरं, कर्हा नदीच्यी तीरावर, येमाईचा दरबार आदी मराठी अल्बम प्रकाशीत झालेले आहे. यासोबत सर्व आघाडीच्या वर्तमानपत्रामध्ये लेखन करतात. कलावंत संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष. यामार्फत अनेक लोककलावंतांना शासनाचे मानधन मिळवून देण्यासाठी पुढाकार त्यांनी घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य शासनाचा जिल्हा व्यसनमुक्ती प्रचार कार्य पुरस्कार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पद्मश्री विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार 2012 ( रूपये एक्कावन्न हजारांचा), लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवनगौरव पुरस्कार - 2018 (रुपये अकरा हजार), सिने अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते छोटु जुवेकर पुरस्कार - मुंबई (1980), सिनेअभिनेते निळु फुले यांच्या हस्ते ग्रामवैभव पुरस्कार (1981) त्यांना मिळाले आहेत.