पुणे जिल्ह्यात खरंच किती झालं मतदान, वाचा... 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 October 2019

राज्य निवडणूक आयोगाने आज (मंगळवार) मतदानाची टक्केवारी प्रसिद्ध केली. जिल्ह्यातील 77 लाख 29 हजार 217 मतदारांपैकी फक्त 44 लाख 13 हजार 375 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

पुणे : वरुणराजाने दाखविलेल्या कृपेनंतरही पुणेकरांनी लोकसभेप्रमाणेच मतदानाकडे पाठ फिरवल्याने पुणे जिल्ह्यात अवघे 57 टक्के मतदान झाले असून, जिल्ह्यातील 21 मतदारसंघांपैकी पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये अवघे 43.29 टक्के मतदान झाले आहे. तर, सर्वांत जास्त इंदापूरमध्ये 75.92 टक्के मतदान झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने आज (मंगळवार) मतदानाची टक्केवारी प्रसिद्ध केली. जिल्ह्यातील 77 लाख 29 हजार 217 मतदारांपैकी फक्त 44 लाख 13 हजार 375 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ग्रामीण भागात मतदारांनी नेहमीचाच उत्साह कायम ठेवत मतदानाचा टक्का वाढविला. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) काही काळ बंद पडल्याच्या तक्रारी वगळता पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत मतदान शांततेत पार पडले. 

गेल्या तीन दिवसांपासून शहर व जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस होत होता. सुदैवाने सोमवारी संपूर्ण दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने मतदानावर पावसाचा कोणताही परिणाम झाला नाही, त्यामुळे शहर व जिल्ह्यात सकाळी उत्साहात मतदार बाहेर पडले. दुपारनंतर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढत गेली. पुणे शहरात मात्र लोकसभा निवडणुकीपेक्षाही या वेळी जास्तीचा निरुत्साह आढळला. त्याचा फटका शहरातील आठही मतदारसंघांतील मतदानाचा टक्का घसरण्यावर झाला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत शहरातील आठही मतदारसंघांत मतदानाचा टक्का घसरला आहे. 
 
मतदानाची टक्केवारी (सकाळी 7 ते अखेरपर्यंत)
- कसबा 51.72 
- पुणे कॅन्टोन्मेंट 43.29
- हडपसर 47.25 
- पर्वती 49 
- खडकवासला 51.35 
- कोथरूड 48.17 
- शिवाजीनगर 43.78 
- वडगावशेरी 46.92 
- भोसरी - 58.65
- पिंपरी - 50.17
- चिंचवड - 53.38
- मावळ - 71.16
- बारामती - 68.38
- पुरंदर - 65.56
- जुन्नर - 67.33
- आंबेगाव - 66.77
- खेड-आळंदी - 67.27
- दौंड - 68.70
- इंदापूर - 75.92
- शिरूर - 67.21
- भोर - 62.93


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voters counting in Pune district for Maharashtra Vidhan Sabha 2019