
शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु असल्याने आजपासून (ता.२४) वाघापूर ते शिंदवणे मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Road Close : वाघापूर ते शिंदवणे मार्ग आजपासून वाहतुकीसाठी बंद
पुणे - पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे ते जेजुरी या राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण आणि शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु असल्याने आजपासून (ता.२४) वाघापूर ते शिंदवणे मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी येत्या २९ एप्रिलपर्यंत म्हणजेच सुमारे ३५ दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद करून बंदच्या कालावधीत या रस्त्यावरील वाहतूक ही सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळविण्यात येणार आहे. नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.