वाई पालिका विशेष सभा वृत्त.

वाई पालिका विशेष सभा वृत्त.
Published on

वाई पालिकेची पहिली सभा खेळीमेळीत

नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विषय मंजूर

वाई, ता. १६ : येथील पालिकेची विशेष सभा नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात आज झाली. सभेत पाच विषयांवर साधक- बाधक चर्चा करून सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेचे कामकाज ऑनलाइन युट्यूबच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्याने ही सभा चर्चेचा विषय ठरली. काही जणांनी पालिका प्रवेशद्वारावर येऊन, तर काहींनी घरबसल्या सभेचे कामकाज अनुभवले.
नगराध्यक्ष सावंत यांनी शहरातील न्यायालयासमोरील आरक्षित वाहतूक बेट परिसरातील जागेत बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भातील सद्यःस्थिती सांगितली. पुतळा तयार करण्याची ऑर्डर दिली असून, सुशोभीकरणाची इतर कामे पूर्ण करून पाडव्याच्या मुहूर्तावर पुतळ्याची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिसराच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्ट अथवा समितीमध्ये नवीन सदस्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहर हद्दवाढ झाल्याशिवाय वाहतूक समस्या व विकास आराखड्यातील कामे मार्गी लागणार नाहीत. त्याचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून प्रस्ताव मंजूर करून घेऊ, तसेच वाहतूक समस्येबाबत आराखडा पोलिसांनी अंतिम मंजुरीसाठी पाठविला असून, त्याची अंमलबजावणी करताना स्थानिक नगरसेवक, व्यापारी व नागरिक यांना विश्वासात घेण्याचा व बेशिस्त वाहनधारकांवर कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आवश्यक पट्टे मारणे, फलक, दिशादर्शक, तसेच १० वॉर्डन उपलब्ध करणे, पे ॲण्ड पार्कसाठी मासिक पास देणे याबाबत चर्चा झाली. त्यावर एक समिती नेमून प्राधान्यक्रमाने उपाय करण्याचा व प्राथमिक खर्चास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कृष्णा नदीच्या उत्तर व दक्षिण तीरावरील पाण्याची दलदल असलेल्या जागेवरील खड्डे बुजवून जागा खाऊ गल्ली म्हणून वापरात आणण्यासाठी सपाटीकरण करणे, परशुराम मंदिर येथे रॅम्प व पायऱ्या करणे तसेच नाना-नानी पार्क येथे सोलार लाइट बसविण्याचा आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लेझर शो करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या दोन शाळा इंग्रजी माध्यमासाठी राखीव ठेवणे तसेच शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शाळांच्या इमारती अन्य ॲकॅडमी अथवा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत, काही सदस्यांनी इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्याऐवजी सर्व शाळा सेमी इंग्रजी तसेच पहिलीपासून इंग्लिश स्पीकिंग वर्ग सुरू करण्याची सूचना केली. त्यानंतर जूनपासून एक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचा तसेच सर्व शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या उपाययोजनांना एकमताने सभागृहाने मान्यता दिली.
सभेत विजय ढेकाणे, संग्राम पवार, अजित शिंदे, प्रसाद बनकर, शैलेंद्र देवकुळे, सचिन सावंत, केतकी मोरे, डॉ. जागृती पोरे, डॉ. जीविता जमदाडे, डॉ. पद्मश्री चोरगे, नीलिमा खरात यांनी चर्चेत सहभाग घेऊन सूचना केल्या.
मुख्याधिकारी संजीवनी दळवी, प्रशासन अधिकारी साईनाथ वाळेकर व विभाग प्रमुख यांनी प्रशासनाचा अभिप्राय सादर करताना सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.
---------------------------------
चौकट

‘वाई महोत्सवा’चे आयोजन

पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असून, उत्पन्न अंदाजे साडेतीन कोटी असून, त्यातील अडीच कोटी रुपये मूलभूत सोयीसुविधांवर खर्च होतात. पालिकेला ४० ते ४२ कोटी रुपये देणे आहे. त्याबाबत पुढील बैठकीत विभागावर माहिती घेऊन निर्णय घेऊ. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असल्याने यापुढे काटकसरीने कारभार करून खर्च बचतीचे मार्ग शोधावे लागणार आहेत. येत्या २५, २६ व २७ जानेवारीला लोकसहभागातून ‘वाई महोत्सव’ आयोजित केला आहे. होम मिनिस्टर, स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असून, त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केले आहे.
------------------------

07472
वाई : पालिकेच्या विशेष सभेत बोलताना अनिल सावंत. त्या वेळी घनशाम चक्के, संजीवनी दळवी आदी.
------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com