टाकवेतील इंद्रायणी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या कामाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

पुलाच्या कामासाठी नऊ कोटी मंजूर आहे. निविदा प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर कामाला सुरुवात होईल.
- वैशाली भुजबळ, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टाकवे बुद्रुक - आंदर मावळाला शहराशी जोडणारा टाकवे येथील इंद्रायणी नदीवरील ब्रिटिशकालीन धोकादायक पुलाच्या कामाला प्रत्यक्ष कधी सुरुवात होणार, याकडे आंदर मावळवासीयांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोमवारी (ता. १६) सकाळी सहाच्या सुमारास आंबी जवळील पूल पडला. मुसळधार पावसात सावित्री नदीवरील पूल पडल्यावर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले होते. त्या वेळी टाकवे येथील पुलाचे ऑडिट करून तो वाहतुकीस धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून अवजड वाहतुकीस बंदी घातली होती. पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड लावले होते. काही दिवसांत ते काढून तेथून पुन्हा अवजड वाहतूक सुरू झाली. 

महत्त्वाची बातमी - Video : जालियनवाला बागेतील दिवस परत आले : उद्धव ठाकरे

या धोकादायक पुलासह कान्हेतील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रलंबित प्रश्‍न न सोडविल्याने काही कारखान्यांनी येथून काढता पाय घेतला. त्याचा रोजगारावर परिणाम झाला आहे.

येथे नव्याने पूल बांधावा, अशी नागरिकांची मागणी होती. भाजप-शिवसेनेच्या सरकारने या पुलाच्या कामासाठी तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने सुमारे नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रशासकीय पातळीवर या पुलाच्या कामासाठी प्रशासन सरसावले आहे. तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर केला आहे. लवकरच त्याचे काम सुरू होईल, असे आश्‍वासन अधिकारी व लोकप्रतिनिधी दिले. मात्र, अद्याप अंमलबजावणी झाली नाही.  

सरपंच सुप्रिया मालपोटे म्हणाले, ‘‘आंबी जवळील पूल पडल्यावर याही पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पुलाचे काम तातडीने सुरू करावे, ही मागणी आहे.’’

पोलिस पाटील अतुल आसवले म्हणाले, ‘‘या पुलावरून अवजड वाहतूक सुरू आहे. दुर्घटना घडण्यापूर्वीच योग्य उपाययोजना करावी. पुलाअभावी कारखानदारीवर परिणाम झाला आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for British bridge work on the Indrayani River in Takave