जालियनवाला बागेतील दिवस परत आले : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

शिवसेनेचे मुखपत्र असलेला "सामना' आम्ही बघत नाही आणि वाचतही नाही, असे म्हणणारे आमचे पूर्वीचे मित्र आणि आजचे विरोधक आज सभागृहात "सामना' दाखवत होते. त्यांनी सामना नेहमीच मन लावून वाचला असता तर आमच्याशी "सामना' करण्याची वेळ भाजपवर आली नसती.

नागपूर : देशात या ना त्या कारणावरून केंद्र सरकार अस्वस्थ वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करीत आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या कॅम्पसमध्ये जाऊन गोळीबार करण्यात आला. यावरून या देशात पुन्हा जालियनवाला बागेतील दिवस परत आले की काय असे भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. युवक या देशाचा आधारस्तंभ आहे. युवा शक्तीच्या या बॉम्बला चुकीच्या पद्धतीने चेतवून वात लावण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे देशाची अखंडता धोक्‍यात येईल, असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिला. 

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला व कामकाज बंद पडले. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानभवनासमोर पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर गेल्या पंचवीस वर्षांपासून रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपासून पंतप्रधान पीक योजनेसाठी आंदोलने आम्ही केली आहेत. यामुळे या प्रश्‍नाची जाण आम्हाला आहे. सभागृहात व्यथा, वेदना मांडा, त्याची उत्तरे आमच्याकडून घ्या. हे परंपरा असलेले सभागृह आहे.

विशेष असे की, शिवसेनेचे मुखपत्र असलेला "सामना' आम्ही बघत नाही आणि वाचतही नाही, असे म्हणणारे आमचे पूर्वीचे मित्र आणि आजचे विरोधक आज सभागृहात "सामना' दाखवत होते. त्यांनी सामना नेहमीच मन लावून वाचला असता तर आमच्याशी "सामना' करण्याची वेळ भाजपवर आली नसती.

हेही वाचा - #NagpurWinterSession : महाविकास आघाडी पाच वर्षांची "मॅच' जिंकणार : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाशी बांधील 
शेतकरी-शेतकरी म्हणून गेले दोन दिवस सभागृहात गोंधळ घातला जात आहे. हे नुसते नाटक आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाशी मी बांधील आहे, तो माझा आणि शेतकऱ्यांमधला आम्हा दोघांचा प्रश्‍न आहे. दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोकं आहोत, ही खात्री महाराष्ट्राला आहे, असेही ते म्हणाले. 

केंद्राच्या नावानं शिमगा करा 
शेतकऱ्यांचं हित आता उफाळून आलं. त्यासाठी जे आदळ आपट करतात त्यांचंच सरकार केंद्रात आहे. त्यांचेच नेते पंतप्रधान आहेत, तेथे गळा मोकळा करा, गळा मोकळा करणाऱ्याला गोळ्या मी देतो. महाराष्ट्रात सर्वसामान्यांचं सरकार काम करीत आहे. मदत करण्यास सुरुवात झाली आहे. आम्ही ओरडलो तेव्हा, केंद्राकडून जीएसटीची थकबाकी चार-साडेचार कोटी आली आहे. परंतु, जीएसटीचा परतावा 15 हजार कोटीचा शिल्लक होता. जीएसटीचा परतावा देण्यास केंद्राने दिरंगाई केली. यामुळे शिमगा करायचा असेल तर केंद्राच्या नावाने करावा, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

अधिक माहितीसाठी - #NagpurWinterSession : शेतकऱ्यांना दिलेले वचन पाळणार : मुख्यमंत्री (व्हिडिओ)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cm uddhav thakrey target bjp over cab at nagpur