समाविष्ट गावांची प्रतीक्षा संपणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

गावकऱ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार आखलेला आराखडा अमलात आणण्याचे नियोजन नव्या अर्थसंकल्पात राहण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, नव्या गावांतील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुरेशी तरतूद करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. 

पुणे - महापालिकेत समावेश होऊन अडीच वर्षे होत आल्यानंतरही पाणी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक सुविधांची मागणी करावी लागणाऱ्या नव्या गावांमधील रहिवाशांना आता त्या सेवा-सुविधा मिळणार आहेत. गावकऱ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार आखलेला आराखडा अमलात आणण्याचे नियोजन नव्या अर्थसंकल्पात राहण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, नव्या गावांतील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुरेशी तरतूद करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हद्दीलगतची अकरा गावे ऑक्‍टोबर २०१७ मध्ये महापालिकेत आली. तेव्हा, ग्रामपंचायतींनी हाती घेतलेली पायाभूत सुविधांची कामे थांबवून नव्याने कामे करण्याची भूमिका महापालिकेने घेतली. त्यासाठी पहिल्याच टप्प्यात ९९ कोटी रुपयांची विकासकामे होतील, अशी घोषणा आयुक्त आणि स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २०१८ मध्ये करण्यात आली होती. मात्र, मागणीच्या तुलनेत   कामे झाली नसल्याचे गाऱ्हाणे मांडत गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर आता गावांना पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या बाबी पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, त्यासाठी गावकऱ्यांचे प्राधान्य काय आहे, हेही जाणून घेण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘‘नव्या गावांमधील गरजा लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांत कामे करण्यात आली आहेत. मात्र, येथील पाण्याची समस्या प्राधान्याने सोडविली जाईल, त्यासाठी समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी सल्लागार नेमून काम सुरू केले आहे. येत्या मार्च महिन्यानंतर प्रत्यक्ष काम हाती घेतले जाईल.’’ 

मिळकतकराची करणार वसुली
नव्या अकरा गावांमधील रहिवाशांनी गेल्या दोन वर्षांत महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही. या कराचे सुमारे दोनशे कोटी रुपये थकले असून, त्याची वसुली महापालिकेने सुरू केली आहे. परंतु, महापालिकेकडून आम्हाला सुविधा मिळत नाहीत, तेव्हा कर का भरायचा, अशी भूमिका मिळकतधारकांची आहे. मात्र, चालू वर्षात ही थकबाकी वसूल करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.

या अकरा गावांचा समावेश
उरळी देवाची, फुरसुंगी, उंड्री, साडेसतरानळी, लोहगाव, आंबेगाव (बु), आंबेगाव (खु), धायरी, उत्तमनगर, शिवणे, मुंढवा (केशवनगर- उर्वरित)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for the villages included in the municipality will end