वाकड-बाणेर प्रवास होणार सुकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

बाणेर रोडला जोडण्यासाठी मुळा नदीवर बांधलेल्या पुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून जागा ताब्यात मिळत नसल्याने आतापर्यंत हे काम अडकून पडले होते. आता पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे.
- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता, पुणे महानगरपालिका

पिंपरी - तुम्ही जर हिंजवडी, रावेत, वाकडमधून निघालात आणि औंधमार्गे पुण्याच्या दिशेने जात असाल तर तुम्हाला बऱ्याचदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असेल. वाकडमधील कस्पटे चौकातून थेट बाणेरमध्ये जाण्यासाठी मुळा नदीवर बांधण्यात आलेला पूल आगामी आठ महिन्यांत वाहतुकीला खुला होणार असल्याने वाहनचालकांचा त्रास कमी होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाणेर ते वाकडमधील कस्पटे चौक यांना जोडणाऱ्या पुलाचे काम कस्पटे चौकातील जागा ताब्यात येत नसल्याने अनेक दिवसांपासून रखडले होते. काही दिवसांपूर्वी ही जागा महापालिकेच्या ताब्यात आली असून, पुलाचा स्पॅम उभारण्याचे काम सुरू केले आहे. मुळा नदीवरून येणारा हा पूल चौकात येत असल्याने पुण्याकडे ये-जा करण्यांसाठी बाणेरचा रस्ता उपलब्ध होणार आहे.

आयटीयन्सचा वेळ वाचणार
हिंजवडी आयटी पार्कमधून पुण्यात जाणाऱ्या आयटीयन्सना औंधमार्गे जावे लागत आहे. सायंकाळी सहा ते नऊ यावेळेत ब्रेमेन चौक, औंध परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. मुळा नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर त्यांच्या वेळेची बचत होणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील रावेत, वाकडकडून येणाऱ्या वाहनचालकांना हा पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. 

चौकाचे रुंदीकरण होणार
मुळा नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाकड भागातील या चौकाचे रुंदीकरण करावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wakad baner Bridge