वारकऱ्यांनी कोरोनासारख्या या भयंकर संकटांनाही दिलंय तोंड... 

palkhi sohala
palkhi sohala

आळंदी (पुणे) : पंढरीची वारी हा वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. घरात कितीही अडचण आली किंवा कोणतीही मोठी नैसर्गिक आपत्ती आली, तरी वारकऱ्यांनी,
देह जावो अथवा राहो 
पांंडुरंगी दृढ भावो... 

ही भावना ठेवून पंढरीची वारी कधी चुकवली नाही. यंदा मात्र कोरोनामुळे वारीवर संकट आले आहे. आतापर्यंत वारकऱ्यांनी अनेक संकटांवर मात करून वारी पूर्ण केली.

राज्यात सन 1865 मध्ये कॉलराची साथ आली होती. त्याकाळी संपूर्ण पंढरपूर शहर रिकामे करण्यात आले होते. परंतु, पंढरीची वारी चुकली नाही. सन 1898 व सन 1956 मध्ये चंद्रभागेला महापूर आला होता. संपूर्ण पंढरपूर शहराला पुराच्या पाण्याने विळखा घातली होता. त्या काळात संतांच्या पालख्या वाखरीला थांबविण्यात आल्या होत्या. फक्त मानकरी होडीतून पादुका घेऊन पांडुरंगांच्या भेटीला गेले होते. राज्यात सन 1918 व सन 1946 मध्ये प्लेगची साथ आली होती. त्यावेळी ऐन वारीत पंढरपूर शहर रिकामे करण्यात आले होते. फक्त संतांच्या पादुका विठुरायाच्या भेटीला आणण्यात आल्या होत्या. 

वारीचा हा इतिहास पाहिला; तर अनेक मोठी संकटे आली असतानाही वारकऱ्यांची पंढरीची वारी चुकली नाही. आज मात्र केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. लाखो लोकांना याची लागण झाली आहे. मुख्यत्वे हा संसर्गामुळेच वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने चैत्री वारीवर बंदी आणली.

चैत्री वारीला पंढरपूरला महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा प्रांतातून लाखो लोक येतात. या वारकऱ्यांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये व देशावर मोठे संकट येऊ नये, त्यामुळे चैत्री वारीला बंदी घातली. सध्याची परिस्थिती पाहता रोज रुग्ण वाढताना दिसत आहे. महाभयंकर संकट पाहता या लाखोंच्या जनसमुदायामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्यासाठी मदत होणार आहे. त्यातून मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे सरकार नेमका काय निर्णय घेणार, याकडे वारकरी लक्ष ठेवून आहेत. 

कोरोनाच्या संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीचे नियोजन करण्यासाठी वारकऱ्यांना अवधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर वारकऱ्यांशी चर्चा करावी, अशी अपेक्षा वारकरी संप्रदायाची आहे.

पुणे व पिंपरी शहरांसह सोलापूर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी झाला नाही. त्यातच संत मुक्ताबाईंचे पालखी प्रस्थान 27 मे रोजी, निवृत्तिनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळा जून महिन्यात आहे. वेळ कमी असल्याने पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुख आणि वारकऱ्यांना सोहळा रद्द होणार किंवा सोहळ्याचे स्वरूप कसे असेल, याबाबत वारकऱ्यांमध्ये चिंता आणि उत्सुकता आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वारकरी सकारात्मक आहेत. त्यामुळे पंढरपुरातील चैत्री वारीही रद्द केली होती. मात्र, आषाढी वारीची परंपरा जपली पाहिजे. त्यासाठी आषाढी वारीसाठी राज्यभरातून येणाऱ्या प्रमुख संतांच्या पालख्यांच्या प्रस्थानचे नियोजन कसे करावे, यासाठी प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तमाम वारकऱ्यांना आता फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच आधार आहे. ते काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

परवानगी दिली तर काय... 
आषाढी वारीला सरकारने परवानगी दिली, तर ती कशी असेल, याबाबत वारकऱ्यांचे चिंतन सुरू आहे. सर्वच संतांच्या पालख्यांतील प्रमुख याबाबत विचारविनिमय करून तोडगा काढत आहे. पंढरपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तेथेही किती लोकांना प्रवेश द्यायचा. कारण, मानाच्या प्रमुख संतांच्या पालख्या आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या निश्‍चित करावी लागणार आहे. लॉकडाउनमुळे सध्या श्री पांडुरंगाचे मंदिर बंद आहे. मंदिर कधी सुरू होणार, हे अवलंबून आहे. वारी काळात मंदिरात प्रवेश किती लोकांना द्यायचा, असे विविध प्रश्‍न चर्चेत असून, शासनस्तरावर सध्या याबाबत माहिती घेतली जात आहे. 

महिलांनाही संधी द्यावी 
वारी काळात महिलांनाही योग्य संधी द्यावी, अशीही मागणी वारकरी संप्रदायातील महिला भाविकांकडून होत आहे. वारीसोबत महिला भाविकांकडे दुर्लक्ष करू नका. कारण, अनेक वर्षांपासून वारीत महिलांना बरोबरीचे स्थान आहे. वारीत चालताना भेदभाव केला जात नाही. त्यामुळेच महिलांची लक्षणीय संख्या वारीत दिसून येते. मात्र, यंदाच्या प्राप्त परिस्थितीत निर्णय झालाच, तर महिला भाविकांनाही योग्य स्थान द्यावे, अशी मागणी महिला भाविकांची आहे. 

तयारीची कामे सुरू करावीत 
आषाढी वारीबाबत अनिश्‍चितता आहे. मात्र, तरीही वारीबाबत सरकारच्या आदेशाचे शेवटपर्यंत वाट न पाहता पालखी मार्गावरील रस्त्यांची आणि तळाची दुरुस्ती आणि सुविधा देण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. कारण, सध्या लॉकडाउनमुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत बंद आहे. पालखी मार्गाला जोड देणारे मुक्कामाच्या गावालगतचे रस्तेही वेगाने दुरुस्त करण्याची मागणी सध्या वारकऱ्यांमधून होत आहे. कारण, पाऊस पडला, तर काम होणार नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष देवून रस्त्यांची कामे मार्गी लावणे गरजेचे बनले आहे. 

संपत्ती सोहळा नावडे मनाला, 
लागला टकळा पंढरीचा... 

या अभंगाप्रमाणे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना लागली आहे. मात्र, प्रतीक्षा आहे ती शासनाच्या आदेशाची आणि लॉकडाउन संपण्याची... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com