पंढरीची पायी वारी घडणार की चुकणार; सोहळ्याचे स्वरूप सरकारच्या निर्णयावरच

शंकर टेमघरे
Thursday, 7 May 2020

आषाढी वारी म्हणजे वैष्णवांसाठी जीव की प्राण; पण कोरोनाच्या महामारीमुळे यंदाची पंढरीची पायी वारी घडणार की चुकणार, या चिंतेने विठ्ठलाचा भक्त व्याकुळलाय. तथापि, वारीबाबत सरकार जो निर्णय देईल, तो शिरसावंद्य मानून त्या दृष्टीने पाऊल उचलण्याची तयारी वारकऱ्यांनी ठेवली आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयावरच यंदाच्या सोहळ्याचे स्वरूप राहणार आहे.

पुणे - आषाढी वारी म्हणजे वैष्णवांसाठी जीव की प्राण; पण कोरोनाच्या महामारीमुळे यंदाची पंढरीची पायी वारी घडणार की चुकणार, या चिंतेने विठ्ठलाचा भक्त व्याकुळलाय. तथापि, वारीबाबत सरकार जो निर्णय देईल, तो शिरसावंद्य मानून त्या दृष्टीने पाऊल उचलण्याची तयारी वारकऱ्यांनी ठेवली आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयावरच यंदाच्या सोहळ्याचे स्वरूप राहणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला पंढरपूरच्या चैत्र वारीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कार्यक्रम निश्‍चित होतो. तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यांचेही वेळापत्रक जाहीर होते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून सरकारने चैत्र वारी रद्द केली. त्यामुळे आषाढीच्या नियोजनाचा कोणताही निर्णय झाला नाही. गेल्या दीड महिन्यापासून विठ्ठल दर्शन बंद केले आहे. त्यामुळे अवघी वैष्णवांची मांदियाळी विठुरायाच्या दर्शनासाठी व्याकुळली आहे.

राज्यातील संतांच्या पालख्यांच्या आषाढी वारी प्रस्थानाच्या तारखा जवळ येत आहेत. त्यामुळे आपली पायी वारी होणार की नाही, याबाबत वारकऱ्यांमध्ये कमालीची चिंता आहे. एकीकडे वैश्‍विक महामारीचे संकट आणि दुसरीकडे विठुरायाच्या चरणी असलेली अतूट श्रद्धा या भावनिक कात्रीत वारकरी संप्रदाय सापडला आहे. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक आहे. सरकारी यंत्रणा परिस्थितीशी अहोरात्र सामना करीत आहे.

अशा अडचणीच्या काळात संप्रदायही सरकारच्या पाठीशी आहे. मात्र, आगामी काळात कोरोनाच्या स्थितीबाबत सरकारचे नेमके धोरण आणि आषाढी वारीची परंपरा याबाबत साकल्याने विचार होण्याची अपेक्षा वारकऱ्यांमध्ये आहे. वारीबाबत पालखी सोहळ्याचे पदाधिकारी, मानकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे आहे. लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढविला आहे. त्यामुळे सरकार आणि पालखी सोहळ्यांचे प्रमुख मानकरी यांच्यात चर्चा होणे अपेक्षित आहे.

राज्यात सुरू असलेल्या साथीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. सर्व पालखी सोहळ्यांचा एकत्रित निर्णय होईल. वारीची परंपरा आणि सध्याचा साथीची परिस्थिती यातून तोडगा काढावा लागेल.
- संजय महाराज धोंडगे, विश्वस्त, संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा, त्र्यंबकेश्वर

परंपरेच्या वारीत खंड पडणार नाही. सरकारबरोबर वारीबाबत अंतिम चर्चा होईल. विठ्ठलाला भक्तांची चिंता आहे. त्यामुळे सकारात्मक मार्ग निघेल.
- विशाल महाराज मोरे, सोहळाप्रमुख, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

कोरोनामुळे सध्या वाईट स्थिती आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. वारीची परंपरा आणि सध्याची स्थिती याचा मेळ घालावा लागेल. एकत्रित निर्णय तातडीने व्हायला हवा.
- रघुनाथ नारायणबुवा गोसावी, सोहळाप्रमुख, संत एकनाथ महाराज देवस्थान, पैठण

वारीत वारकरी संप्रदाय आणि सरकार हे एकमेकांशी पूरक असतात. सरकारच्या मदतीशिवाय वारी अशक्‍य आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारला मदत करणे संप्रदायाचे काम आहे. तसेच वारीच्या स्वरूपाबाबत संप्रदायातील संबंधित सर्व घटकांना विश्‍वासात घेऊन सरकार निर्णय घेईल. सरकारला अपेक्षित पत्रव्यवहार केला आहे.
- ॲड. विकास ढगे-पाटील, प्रमुख विश्‍वस्त, संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वारीवर मोठे संकट आले आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. तिच्या स्वरूपाची चर्चा सर्व पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी एकत्रित करण्याची गरज आहे.
- गोपाळ महाराज गोसावी, सोहळाप्रमुख, संत सोपानदेव पालखी सोहळा, सासवड

सरकारचे नियम आणि वारकऱ्यांची परंपरा या दोन्ही गोष्टींचा विचार सद्यस्थितीला आवश्‍यक आहे. सर्व पालखी सोहळे समन्वयातून निर्णय घेतील. आम्ही सरकारकडे वारीबाबत पत्रव्यवहार केला आहे.
- रवींद्र भय्या पाटील, अध्यक्ष, मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aashadhi wari decision government warkari