रामनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत खाटपेवाडी तलावाच्या पाण्याची क्षमता ४५ टक्क्यांनी वाढवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water capacity of Khatpewadi Lake increased by 45 percent Ramnadi Rehabilitation Project drone Survey pune

रामनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत खाटपेवाडी तलावाच्या पाण्याची क्षमता ४५ टक्क्यांनी वाढवली

पुणे : रामनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत रामनदीच्या उगम क्षेत्रात असलेल्या खाटपेवाडी येथील तलावाच्या पाण्याची क्षमता ४५ टक्क्यांनी वाढल्याची बाब नुकतीच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि किर्लोस्कर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने खाटपेवाडी येथील तलाव पुनरुज्जीवनाचे काम यशस्वी करून सर्वांसमोर एक आदर्श प्रारूप उभे केले आहे, अशी माहिती किर्लोस्कर वसुंधरा रामनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे समन्वयक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकाद्वारे दिली.

ड्रोनद्वारे या तलावाचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. सातत्य आणि चिकाटीने खाटपेवाडी तलावावर काम केल्याने या तलावाच्या पाण्याची क्षमता वाढली आहे. हा मानवनिर्मित पाझर तलाव १९७२मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात बांधण्यात आला होता. तेव्हापासून या तलावातील गाळ काढण्यात आलाच नव्हता. किर्लोस्कर वसुंधरा रामनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत या तलावातून सुमारे ३०० ट्रक गाळ काढण्यात आला आणि तो इतरत्र न टाकता तलावाच्या किनाऱ्यावर टाकून तेथे करंज, लिंब, वड, पिंपळ, कांचन, अर्जुन अशी देशी स्थानिक झाडे लावण्यात आली.

ती झाडे आता १५ ते २० फुटांपर्यंत उंच वाढली आहेत. एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या विद्यार्थांच्या मदतीने तलावावर विविध प्रयोग राबविण्यात आले. या प्रयोगांमुळे पाण्यातील प्रदूषित तत्त्वे शोषून घेतली जातील, अशा वनस्पती तलावात सोडण्यात आल्या. त्यामुळे पाण्याची ऑक्सिजन पातळी देखील वाढली आहे. गाळ काढल्याने तलावाची पाणी धारण क्षमता वाढून आजूबाजूच्या विहिरींची पाण्याची क्षमता वाढली. यासाठी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या १२ संस्था, ३३ महाविद्यालये, रामनदी परिसरातील २५ शाळांचा सहभाग मोलाचा ठरला, असेही चित्राव यांनी सांगितले.

Web Title: Water Capacity Of Khatpewadi Lake Increased By 45 Percent Ramnadi Rehabilitation Project Drone Survey Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..