महापौरांच्या हट्टापायी पाणी कपात सुरूच

संदीप घिसे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

जलपूजन केल्याशिवाय नियमित पाणी पुरवठ्याचा निर्णय घेऊ नका, अशी आग्रही भूमिका महापौर राहूल जाधव यांनी घेतली. यामुळे शहरवासियांना नियमित पाणी पुरवठ्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

पिंंपरी (पुणे) : जलपूजन केल्याशिवाय नियमित पाणी पुरवठ्याचा निर्णय घेऊ नका, अशी आग्रही भूमिका महापौर राहूल जाधव यांनी घेतली. यामुळे शहरवासियांना नियमित पाणी पुरवठ्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

सोमवारी (ता.५) पाणी कपात रद्द करण्याबाबत महापालिका भवनात गटनेत्यांची बैठक झाली. या बैठकीस महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्ष नेते नाना काटे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे उपस्थित होते. या बैठकीत नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी सर्व गटनेत्यांनी केली. आयुक्तांनीही त्यास दुजोरा दिला. मात्र महापौर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पाणीकपात रद्दचा निर्णय लांबणीवर पडला.

पवना धरण ८५ टक्के भरल्यानंतर नागरिकांनी पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली. मात्र धरण शंभर टक्के भरल्याशिवाय पाणी कपात मागे घेणार नाही, अशी भूमिका महापौर राहुल जाधव यांनी मांडली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये धरण शंभर टक्के भरले. मात्र ७ अॉगस्ट रोजी जलपूजन केल्याशिवाय कपातीचा निर्णय घेऊ असे महापौर जाधव यांनी गटनेत्यांच्या बैठकीत सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water cuts continue in PCMC as per Mayor order