esakal | पुणेकरांनो, आता दर गुरवारी होणार पाणी कपात
sakal

बोलून बातमी शोधा

tap.jpg

- जलकेंद्रांची देखभाल-दुरुस्तीला प्राधान्य आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली पाणीकपात केली जाणार असल्याचे स्पष्ट आहे. 
- निवडणूक आणि दिवाळी संपल्याने पूवीप्रमाणे गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. 

पुणेकरांनो, आता दर गुरवारी होणार पाणी कपात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : विधानसभा निवडणूक आणि दिवाळीही संपल्याने आता पुणेकरांना पुन्हा पाणीकपात सोसावी लागण्याची शक्‍यता आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रांची आठवड्याला दुरुस्ती करीत, दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, वडगाव जलशुध्दीकरण केंद्रातून सुरू असलेली आठवड्यातील एक दिवसाची पाणीकपात कायम राहणार आहे. जलकेंद्रांची देखभाल-दुरुस्तीला प्राधान्य आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली पाणीकपात केली जाणार असल्याचे स्पष्ट आहे. 

शहरात अजूनही पाऊस असून, सगळी धरणे शंभर टक्के भरली आहेत. तरीही पुणेकरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या प्रचंड तक्रारी आहे. धरणांत पाणी असूनही केवळ देखभाल-दुरुस्तीचे कारण देत, आठवड्यातून एक दिवस म्हणजे, दर गुरूवारी बहुतांशी भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. अपुऱ्या पाण्यामुळे पुणेकरांनी निवडणूक आणि दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्याचा फटका बसण्याच्या शक्‍यतेने प्रचार काळात सर्व भागांत पाच ते सहा तास पाणी सोडण्यात आले. त्यानंतर दिवाळीतही पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही, याची काळजी महापालिका प्रशासनाने घेतली. या काळात गुरुवारीही पाणी सोडण्यात आले होते. मात्र, काही भागांत पाणी आले नसल्याने रहिवाशांचे हाल झाले. परंतु, वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा खुलासा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला होता. निवडणूक आणि दिवाळी संपल्याने पूवीप्रमाणे गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी म्हणाले, "शहराच्या सर्व भागांतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलकेंद्राची दुरस्ती वेळेत झाली पाहिजे. त्यासाठीचे नियोजन केले आहे. त्यामुळे काही केंद्रतून होणारा पाणीपुरवठा दुरुस्तीदरम्यान बंद ठेवावा लागणार आहे.''