
उंड्री : पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे, रोजगार मिळत नाही, त्यामुळे आम्ही लिंबू सरबत, ऊसाचा रस म्हणून माठातील पाण्यावर हौस भागवतो, असे उंड्री चौकातील कष्टकरी-कामगार दिलीप आबनावे यांनी सांगितले. राजेंद्र भिंताडे म्हणाले की, कडाक्याचे उन असूनही कष्टकरी उन्हामध्ये काम करीत आहेत. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या कामगारांना किमान पाणी तरी प्रशासनाने वेळेवर दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मागिल काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. नागरिकांचे पाय सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लिंबू सरबत, ऊसाचा रस, कोल्ड्रिंक्स, ताक, लसी घेण्याकडे वळत आहेत. उन्हामुळे लिंबाची आवक कमी झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत. दहा रूपयाला लिंबू खरेदी करावे लागत आहे, तरीसुद्धा रसाचा भाव वाढविला नाही. मात्र, ग्लासामध्ये एका लिंबाऐवजी आता चवीपुरतेच लिंबू वापरत असल्याचे उंड्री चौकातील ऊसाच्या गुऱ्हाळचालक सुभाष कोळी यांनी सांगितले.
लिंबू सरबतवाल्यांनीही एका लिंबाचा वापर चार ग्लाससाठी करतात. मागिल आठवड्यापासून लिंबाचे भाव अचानक गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता उन्हाळा संपेपर्यंत तरी लिंबाचे भाव कायम राहतील असा अंदाज उंड्री ग्रामस्थ दत्तात्रय फुलावरे, दिनेश घुले, बाळू घुले त्यांनी व्यक्त केला. डॉ. अश्विन खिलारे म्हणाले की, सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाच्या झळयांचा त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना डोक्यावर पांढरे कापड बांधावे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अघोरी उपचार करण्याऐवजी तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत, ही काळाजी गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.