धरणातील पाणीसाठा ऑगस्टपर्यंत राखून ः पालकमंत्री विखे

धरणातील पाणीसाठा ऑगस्टपर्यंत राखून ः पालकमंत्री विखे
Published on

धरणांतील पाणीसाठा राखीव
पालकमंत्री विखे ः चाऱ्यासाठी बियाणे देण्याच्या विचाराधीन
अहिल्यानगर, ता. ८ ः अलनिनोचा धोका लक्षात घेऊन सर्वच धरणांतील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत राखून ठेवण्याचे नियोजन राज्यभरातच केले आहे. जिल्ह्यात यावर्षी धरणांतील पाण्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने झाल्याने पाणीसाठा टिकून आहे. टंचाई परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. प्रत्येक तालुक्याचा दौरा करून परिस्थिती जाणून घेणार आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा म्हणून चारा उत्पादन योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण राबवावे लागेल, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
पालकमंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांचा आढावा बैठक घेतली. या प्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.
मंत्री विखे म्हणाले की, जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थिती विचारात घेऊन धरणांतील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यास प्राधान्य दिले आहे. सद्यपरिस्थितीत चारा उपलब्ध असला, तरी पुढचे आव्हान लक्षात घेऊन जिल्ह्यातून चारा बाहेर घेऊन जाण्यास बंदी करावी लागणार आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देऊन भविष्यातील नियोजन केले आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असे नियोजन प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मागणी असेल तेथे टँकरची व्यवस्था करण्यास प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपण दौरा करणार असून, बैठकांमधून टंचाईग्रस्त भागातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सद्य परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर नसला, तरी भविष्यातील धोका विचारात घेऊन मागील वर्षाप्रमाणेच पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून चारा उत्पादन योजनेची अंमलबजावणी करावी लागेल. यासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे देऊन झालेले उत्पादन निश्चित केलेल्या सरकारी दराप्रमाणे खरेदी करण्याच्या योजनेची अंमलबजावणी करावी लागेल, यासाठी राज्यस्तरावर धोरण ठरवावे लागेल. कृषी विद्यापीठाला चारा उत्पादन वाढीसाठी विशेष कार्यक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील जल जीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा झालेली काम पाण्याचे उद्‍भव विचारात न घेता केली गेली. अनेक ठिकाणी पाइपलाइनची कामे पूर्ण झाली असली, तरी तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने पाणीपुरवठा होऊ शकत नाही. अनेक ठिकाणी ठेकेदारांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता योजनांची काम केली, ही वस्तुस्थिती आहे. पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीत घेणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
-------------
चौकट
पश्चिम बंगालमधील जंगलराज संपले
पश्चिम बंगालमधील जंगलराज तिथल्या लोकांनी संपविले. घुसखोरीच्या बळावर अनेक वर्षे राज्य सुरू होते. तिथल्या जनतेनेच लोकशाहीच्या मर्यादेत राहून परिवर्तन केले आहे. पश्चिम बंगालचा निकाल पाहता देशातील घुसखोरांचे समूळ उच्चाटन करावेच लागणार आहे, असे पालकमंत्री विखे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com