शेतकऱ्यांनी चालवलं 'एक्सप्रेस' डोकं, आता शेती पिकणार सोन्यासारखी...

someshwar
someshwar

सोमेश्वरनगर (पुणे) : पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या शेतकऱ्यांना केवळ आठ तासांची वीज मिळायची. परिणामी अडीच महिन्यांनीच पाण्याची पाळी येणे आणि तोवर पिके धडकणे, हेच नशिबी होते. मात्र, संस्थेने मोठ्या हिकमतीने तब्बल सत्तेचाळीस लाख रूपये खर्चून 'एक्सप्रेस फीडर' योजना राबविली आहे. तब्बल सोळा तासांची अखंडित वीज मिळणार आहे. आता पाण्याची पाळी पंधरा दिवसात येणार असून, शेतीउत्पादनातही भरीव वाढ होणार आहे. वीस वर्षांनी स्वतःच्या हिमतीवर पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याच्या शेतकऱ्यांच्या जिद्दीला सगळेच दाद देत आहेत.

सोमेश्वर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष कै. वसंतकाका जगताप यांच्या मदतीमुळे जेऊर येथील जुन्या उपसा सिंचन योजनेतून विभाजन होऊन सन १९९९ मध्ये भैरवनाथ पाणी पुरवठा संस्था अस्तित्वात आली. तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनीही योजनेस तत्काळ परवाना दिला. गावाजवळील नीरा नदीच्या बंधाऱ्यावरून पाणी उचलले. संस्थेची सभासदसंख्या हळूहळू वाढत गेली. पाच पाईपलाईनद्वारे सध्या १७० सभासदांचे ४४७ एकर क्षेत्र भिजत आहे. सर्वच ऊस उत्पादक असल्याने सोमेश्वर कारखान्यामार्फत शंभर टक्के वसूलही होत होता. मात्र, वीज उपलब्धता केवळ आठ तास आणि तीही अनियमित व कमी दाबाने मिळत असल्याने शेतकऱ्यांना अडीच महिन्यांनीच पाण्याची पाळी यायची. अनेकदा उन्हाळ्यात पिके धडकून जायची. वीजकंपनीविरोधात आंदोलनेही व्हायची. काहींनी नाईलाजाने विहिरी खणून किंवा अन्य शेतकऱ्यांकडून पाणी घेऊन मधल्या वेळेची गरज भरून काढली.  

संस्थेचे अध्यक्ष उत्तम धुमाळ व संचालक मंडळाने व्यवस्थापन उत्तम करत वीजबिल व अन्य खर्चातून दरवर्षी बचत केली. त्या रकमा बँकेत अनामत ठेवल्या. ही रक्कम एकवीस लाखापर्यंत पोचली होती. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाने वीजकंपनीचे सबस्टेशन जेऊरपासून चार किलोमीटरवर पिसुर्टी येथे स्थापन झाले. त्यामुळे पिसुर्टीपासून जेऊरपर्यंत 'एक्सप्रेस फीडर' (सोळा तास वीज देणारी स्वतंत्र यंत्रणा) आपण आणू शकतो, अशी शेतकऱ्यांना खात्री वाटली. पण, एकवीस लाखात मेळ बसणार नसल्याने पुन्हा एकरी बारा हजार रूपये वर्गणी काढली. यानंतरही रक्कम कमी पडली. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व संचालक मंडळाने कारखान्यामार्फत पंधरा लाखांची मदत केली. तब्बल 47 लाख रूपये खर्चून ६० खांब टाकून चार किलोमीटर वीज शेतकरी आणू शकले. शेतकऱ्यांची ही जिद्द बघून वीजकंपनीच्या अधिकाऱ्यांनीही मोकळेपणाने मदत केली. 

आज सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्या हस्ते एक्सप्रेस फीडर योजनेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उत्तम धुमाळ, संचालक मोहन जगताप, वीज कंपनीच्या कनिष्ठ अभियंता व्ही. ए. मांगुळकर, योजनेचे अभियंता संग्राम शेंडकर, सरपंच प्रतिक धुमाळ, शामराव धुमाळ, सचिव संजय सांगळे, उपाध्यक्ष माणिक धुमाळ उपस्थित होते.

आणखी पन्नास एकर क्षेत्र वाढविणार
अजितदादा, वसंतकाका यांच्यामुळे संस्था उभी राहिली. वीज आठ तासांवर आल्याने शेतकऱ्यांचे खूप हाल झाले. मात्र, आता स्वयंपूर्ण झालो असून, ऊस उत्पादनात एकरी वीस टनांची वाढ होईल. एक- दोन पिकातच खर्च वसूल होईल. आताचा २०० केव्ही क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर आहे, तर ऐंशी हॉर्सपॉवरचे पाच वीजपंप पाच पाईपलाईनमधून शेतकऱ्यांना पाणी पुरवत आहेत. अजून वीस हॉर्सपॉवरचा परवाना शिल्लक आहे. त्यामुळे सहावी पाईपलाईन करून आणखी वाढीव पन्नास एकर क्षेत्र भिजते करणार, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष उत्तम धुमाळ यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com