ऐन पावसाळ्यात पुण्यात पाण्यासाठी तारांबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply close

दक्षिण पुण्यात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात सातत्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

ऐन पावसाळ्यात पुण्यात पाण्यासाठी तारांबळ

कात्रज - वडगाव पंपिग स्टेशनवरून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाली. विजेच्या २२ केव्ही ब्रेकरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पाणीपुरवठा झाला नाही. वडगाव पंपिग स्टेशनवरून पाणीपुरवठा होणाऱ्या सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, कोंढवा, आंबेगाव, नऱ्हे आदी परिसरात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिक त्रस्त झाले.

दक्षिण पुण्यात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात सातत्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या घटनेने नागरिकांच्या मनात पाणीप्रश्नावरून प्रशासनाच्या विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून पाणीचोरी, पाणीगळती होत आहे, अशा तक्रारी येत आहेत. त्यातच पाणीपुरवठाच झाला नसल्याच्या तक्रारी आल्याचे पाहायला मिळत आहे.

२२ केव्ही ब्रेकरमध्ये बिघाड होऊन इन्सुलेटर गेला होता. ही दुरुस्त करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यात काल सातत्याने पाऊस पडत होता. पंपिग स्टेशनवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बराच वेळ गेला. त्यामुळे पाणीपुरवठा होण्यास अडचणी निर्माण झाल्या. मंगळवारी वडगाव पंपिग स्टेशनवरील पाचपैकी चार पंपाद्वारे आम्ही सुरळीत पाणीपुरवठा केला असून उर्वरित एका पंपाचे काम सुरू आहे. उर्वरित एका पंपाचे कामही लवकरच होईल. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल.

- जालिंदरसिंह राजपूत, शाखा अभियंता, विद्युत

काल वीजपुरवठा खंडित झाल्याने पंपिग स्टेशनवरून टाक्यांना पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्‌भवली होती. परंतु, पंपिग स्टेशनवरून अपुरा पाणीपुरवठा होणे, खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आम्हीच हतबल झालो आहोत.

- संदीप मिसाळ, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा

अपुरा पाणीपुरवठा होत असताना मंगळवारी (ता.१२) रोजी पाणीपुरवठाच झाला नाही. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, वडगाव पंपिंग स्टेशनकडून पाणीपुरवठा झालेला नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, ऐन पावसाळ्यात आम्हाला अशा प्रकारच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने चिडचिड होते.

- हेमंत धायबर, अध्यक्ष, राजस सोसायटी

प्रशासनाच्या गाफील कारभाराची ही उदाहरणे आहेत. केवळ हलगर्जीपणाने काम केल्यानेच अशा प्रकारच्या घटना घडत असतात. त्याचा नाहक त्रास आम्हाला सहन करावा लागतो.

- सुजाता आतकरे, स्थानिक महिला

टॅग्स :puneMonsoonWater supply