esakal | काय सांगता, ऐन पावसाळ्यात पुण्यात पाणीटंचाई? 
sakal

बोलून बातमी शोधा

pmc.jpg

पाणीपुरवठा विस्कळीत असल्याचे कागदोपत्री दाखवून टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने 28 लाख रुपये मंजूर केले आहेत.

काय सांगता, ऐन पावसाळ्यात पुण्यात पाणीटंचाई? 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे जवळपास शंभर टक्के भरली आहेत. त्याआधीपासून संपूर्ण शहरात सर्वत्र रोज पुरेशा प्रमाणात पाणी सोडले जात आहे. शिवाजीनगरमधील घोले रस्ता परिसरात तर फारशी पाणीटंचाई कधी नव्हती आणि सध्या; तर तशी शक्‍यताही नाही. परंतु, याच भागात पाणीपुरवठा विस्कळीत असल्याचे कागदोपत्री दाखवून टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने 28 लाख रुपये मंजूर केले आहेत. गंभीर म्हणजे हा खर्च जेमतेम सहा महिन्यांचा आहे. अर्थात, ऐन पावसाळ्यात तेही धरणे भरली असतानाही पाणी टंचाई भासवून निविदा काढल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.

दरम्यान, शहरातील पाणी पुरवठ्याची स्थिती माहिती असूनही स्थायी समितीने मंगळवारी 28 लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव बिनबोभाट मंजूर केला. हा प्रस्ताव घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचा आहे. त्यांच्याकडेच सविस्तर माहिती मिळेल, इतका खुलासा करीत स्थायीच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवणे पसंत केले. 

पुणे शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू आहेत. त्यातच मध्यवर्ती भागातील पेठा आणि परिसरात पाणी टंचाई असल्याचे फारसे ऐकिवात नाही. त्यात घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत तांत्रिक कारणे वगळता पाणीपुरवठा बंद नसल्याचे दिूसन आले आहे. परंतु, याच भागात पाणीपुरवठा नसल्याने त्याठिकाणी टॅंकरने पाणी पुरविण्याचे नियोजन घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने केले आहे. त्यासाठी रहिवाशांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याकरिता 28 लाख रुपये खर्च येणार आहे, असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडला. त्याला स्थायी मंजुरी दिली आहे. 

गणेश विसर्जनासाठी सुरू केलेल्या फिरत्या हौदांसाठी कचऱ्याचे कंटेनर उभारल्याच्या मुद्यावरून वाद सुरू असतानाच संबंधित ठेकेदाराचा काळ्यायादीत समावेश करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही बाब गंभीर असून, तिची दखल घेऊन ठेकेदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत समावेश केले जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

loading image
go to top