Ujani Dam Water : ‘उजनी’तील पाणीसाठा पोहोचला निम्म्यावर; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

उजनी धरणातून सोलापूरकरांची तहान भागविण्यासाठी नदी पात्रातून सोडलेल्या पाण्यामुळे धरणातील पाणी साठा ५० टक्क्यांवर पोचला आहे.
Ujani Dam Water
Ujani Dam Watersakal
Updated on

पळसदेव - उजनी धरणातून सोलापूरकरांची तहान भागविण्यासाठी नदी पात्रातून सोडलेल्या पाण्यामुळे धरणातील पाणी साठा ५० टक्क्यांवर पोचला आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वीचे आगामी चार महिने धरणातील पाण्याचे नियोजन करून टंचाईची तीव्रता कमी करण्याचे मोठे आव्हान पाटबंधारे विभागाला पेलावे लागणार आहे. उन्हाळ्यापूर्वीच धरण निम्मे रिकामे केल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

उजनी धरणामध्ये सुमारे ५० टक्के म्हणजे ९० टीएमसी पाणीसाठा आहे. यामध्ये सुमारे ६४ टीएमसी मृत साठा तर २६ टीएमसी उपयुक्त पाणी साठा आहे. १७ फेब्रुवारीला धरणात सुमारे ६४ टक्के म्हणजे सुमारे ९८ टीएमसी पाणी साठा असताना सोलापूर, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर शहरांसह नदीलगतच्या इतर गावांच्या पाणी पुरवठा योजनांना पाणी मिळण्यासाठी नदीतून सुमारे ६ हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले होते.

याशिवाय दहीगाव व सीना माढा योजनांसाठी सुमारे ४५० क्यूसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. गेल्या चौदा दिवसांपासून नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. यामध्ये टप्प्याटप्प्याने ६ हजार क्युसेकवरून १६०० क्युसेकपर्यंत पाण्याच्या विसर्गात कपात करण्यात आली होती. या दरम्यान १६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग हा वीज निर्मितीसाठी देण्यात आला होता. यामुळे गेल्या चौदा दिवसांत धरणातील सुमारे आठ टीएमसी पाणी साठा कमी झाला आहे.

धरणातील मृत साठ्यातील पाणी वगळून उपयुक्त साठ्यातील पाण्याचे वाटप होणे गरजेचे आहे. मृत साठ्यातील पाण्यावर धरणग्रस्तांचा हक्क आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून धरणातील पाणी खरडून उपसण्याचा सपाटा पाटबंधारे विभागाने लावला आहे. या मोठा परिणाम धरणग्रस्तांच्या शेती व्यवसायावर होत आहे. यंदा धरण ११० टक्के भरूनही उन्हाळ्यापूर्वीच ते आता निम्मे रिकामे करण्यात आहे. पुढील चार महिने धरणातील पाणी कसे पुरविणार याचे स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.

- भूषण काळे, संचालक, कर्मयोगी साखर कारखाना

नदीतून ४.७५ टीएमसी पाणी सोडले आहे. याव्यतिरिक्त बिगर सिंचन योजना, पाणलोटक्षेत्रातील उपसा सिंचन योजना, बाष्पीभवन यांसारख्या कारणांमुळे धरणातील पाणी पातळीत घट झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेने बंद जलवाहिनीमधून पाणी नेण्याच्या योजनेच्या जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी घेतली आहे. यामुळे बंद जलवाहिनीमधून पाणी नेण्यास सुरुवात झाल्यास, पाणी बचत होण्यास मदत होईल.

- रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी पाटबंधारे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com