शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, तीन जिल्ह्यांसाठीच्या या प्रकल्पाचा साठा चिंताजनक 

रवींद्र पाटे
Wednesday, 5 August 2020

कुकडी प्रकल्पात आजअखेर २४.१३ टक्के (७.१६ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गत वर्षी प्रकल्पात आजअखेर ७३.८३ टक्के (२१.९१ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. कुकडी प्रकल्पात आज अखेर झालेला उपयुक्त पाणीसाठा मागील तीन वर्षाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. 

नारायणगाव (पुणे) : कुकडी प्रकल्पात आजअखेर २४.१३ टक्के (७.१६ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गत वर्षी प्रकल्पात आजअखेर ७३.८३ टक्के (२१.९१ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. कुकडी प्रकल्पात आज अखेर झालेला उपयुक्त पाणीसाठा मागील तीन वर्षाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सात तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

यंदा डाळिंबाचा नाद करायचा नाय

कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात आजअखेर सरासरी ३३९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात सप्टेंबरअखेर सरासरी ११६२ मिलिमीटर पाऊस झाला होता. प्रकल्पात ९३.२६ टक्के (२७.६७ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. कुकडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठयाची सद्यस्थिती चिंताजनक असून, शेतकरी वर्ग मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मागील तीन वर्षांच्या तुलनेत प्रकल्पात कमी पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुकडी प्रकल्पातील पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सात तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचन व बिगर सिंचनासाठी होतो. कुकडी प्रकल्पात झालेल्या पाणी साठयावरच सात तालुक्यातील रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांचे भवितव्य अवलंबून असते. तुलनात्मक दृष्टीने सन २०१७, सन २०१८, सन २०१९ मध्ये कुकडी प्रकल्पात आजअखेर अनुक्रमे ७९ टक्के (२२ टीएमसी), ६३.२६ टक्के (१९.३१ टीएमसी), ७३.८३ टक्के (२१.९१ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला होता, अशी माहती कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली. 

कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातील उपयुक्त पाणीसाठा टीएमसीत व कंसात टक्केवारी : येडगाव : ०.७२० (३७.५ ), माणिकडोह : १.३२ (१३), वडज : ०.४०० (३४.१५), डिंभे ४.७१६ (३७.७४). पिंपळगाव जोगे धरणात अद्याप उपयुक्त पाणीसाठा झाला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water storage in the dams of the Kukdi project decreased