यंदा डाळिंबाचा "नाद करायचा नाय' 

श्रीकृष्ण नेवसे
Wednesday, 5 August 2020

पुरंदर तालुक्‍यात गेल्या दीड-दोन दशकात डाळिंब लागवड व बागा वाढल्या. उत्पादनही वाढले. मात्र गतवर्षी अतिवृष्टीने आणि यंदा विविध रोगांच्या प्रादुर्भावाने डाळिंब संकटात आले आहे.

सासवड (पुणे) : सांगोला व इतर डाळिंब पट्ट्यात विविध रोगांच्या प्रादुर्भावाने डाळिंब फळबागा अडचणीत आलेल्या असताना पुरंदर तालुक्‍यात गेल्या दीड-दोन दशकात डाळिंब लागवड व बागा वाढल्या. उत्पादनही वाढले. मात्र गतवर्षी अतिवृष्टीने आणि यंदा विविध रोगांच्या प्रादुर्भावाने डाळिंब संकटात आले आहे.

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

वाहतूक व विक्री व्यवस्थेची साखळी पूर्ववत न झाल्याने इथला प्रगती करणारा सुमारे 40 गावांतील डाळिंब उत्पादक शेतकरी दुहेरी अडचणीत आला आहे. त्यातच डाळिंबाचा नाद सोडण्यापर्यंत शेतकरी पोचल्याने काही भागात बागा तोडण्याचे धाडस शेतकरी करू लागला आहे. 

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 

साधारणतः जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान छाटणी केलेल्या बागांचा हंगाम सुरू आहे. नंतर छाटणी करून बहर धरलेल्या बागांचा हंगाम महिनाभर पुढे आहे. यंदा फळधारणा झाल्यानंतर वा फळांची वाढ होताना जीवाणूजन्य (तेलकट डाग) व बुरशीजन्य ठिपक्‍यांच्या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच डाळिंब बागांमध्ये झाला. शिवाय मर आणि इतर प्रादुर्भाव होत असल्याने डाळिंबाचे बाजारमूल्य घटत आहे. तो अनुभव सध्या येतोय. 

रोग-कीड वाढण्याची कारणे 
- मागील वर्षाच्या अतिवृष्टीने झालेल्या प्रादुर्भावातून डाळिंब बागा बाहेर निघालेल्या नसतानाच यंदा सतत ऊन-पावसाचा खेळ 
- त्यामुळे रोगास पोषक हवामान तयार 
- त्यात कोणी अगोदर तर कोणी उशिरा छाटणी करून बहर धरला 
- लागवडीतील दोन झाडांतील अंतर योग्य न ठेवल्याने व शाखीय वाढ, हवा खेळती न राहणे, स्वच्छतेचा अभाव, यातून प्रादुर्भाव 
- छाटणीत कृषी शास्त्रशुद्ध नियम न पाळल्याने जिवाणूंचा शिरकाव 
- योग्य सल्ल्याशिवाय वारेमाप फवारण्या 
- पाऊस पडल्यानंतर आवश्‍यक निचरा न होणे 
- योग्य आणि एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन नसणे 
- कृषी विभाग बांधापर्यंत न येणे 

अशी आहे सध्याची स्थिती 
- पुरंदरमध्ये कर्नलवाडी, राख, धालेवाडी, रानमळा, कोथळे, भोसलेवाडी, दिवे आदी 15 ते 20 गावांत मोठ्या प्रमाणात डाळिंब पीक 
- अजून 20 ते 25 गावांत मध्यम स्वरूपात बागा 
- तीन-चार वर्षांपूर्वी सुमारे 3,000 एकर क्षेत्रावर बागा 
- जुन्या 60 टक्के बागा रोग-कीड प्रादुर्भावाने शेतकऱ्यांनी तीन वर्षांत तोडल्या 
- नव्या लागवडीच्या बागांसह सध्या 1,250 एकरावर सध्या बागा 
- त्यातील निम्म्या क्षेत्रात तोडणी हंगाम सुरू असतानाच रोग-किडीचा फळांवर परिणाम दिसल्याने बाजारभाव पडलेलेच 
- विविध बाजारपेठेपर्यंतची वाहतूक व विक्री व्यवस्थेची कोरोनामुळे तुटलेली साखळी 
- मागील काही वर्षे 20 किलो क्रेटला 1,200 ते 2,000 रुपये मिळायचे 
- सध्या क्रेटला 300 ते 600 रुपये भाव 

 

रोग-कीड एकात्मिक व्यवस्थापनास आता अनुदान नसल्याने शेतकरी त्यास तोंड देत नाही. त्यामुळे होत्या त्या जुन्या 50 टक्के डाळिंब बागा तुटून जमीनदोस्त झाल्याची कृषी क्षेत्राच्या जाणकारांना दखल घ्यावी लागेल. 
- संभाजी गरुड (बेलसर), निवृत्त कृषी चिकित्सालय अधिकारी, पुरंदर 
 
डाळिंबावर संकट आहेच. पण साऱ्या शेतकऱ्यांनी मिळून एकात्मिक पद्धतीने पीक व्यवस्थापन केले. तर नंबर एक प्रतीच्या डाळिंबास 800 ते 1000 रुपये भाव मिळत आहे. सर्वांचे असे नाही, पण माझा अनुभव आहे. 
- सुधीर निगडे, प्रयोगशील डाळिंब उत्पादक व सरपंच, कर्नलवाडी, ता. पुरंदर 

सर्वत्र डाळिंब पीक वाढले. कधी भाव पडतात, त्यावेळी डाळिंब प्रक्रिया करून अनारदाना, ज्यूस व तत्सम प्रकिया उत्पादने वाढली तर उत्पादक सुरक्षित होईल. 
- डॉ. विक्रम कड, राहुरी कृषी विद्यापीठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate growers in Purandar taluka are in trouble