मांजरी : समाविष्ट गावांतील पाणी प्रश्न गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply issue in manjri villages included in municipality lack of tanker water supply

मांजरी : समाविष्ट गावांतील पाणी प्रश्न गंभीर

मांजरी : पाण्याचे आटलेले स्रोत, पावसाने दिलेली ओढ आणि महापालिकेने झटकली जबाबदारी यामुळे परिसरातील समाविष्ट गावांचा पाणी प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. येथील नागरिकांना सध्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. आठ-दहा दिवस प्रतीक्षा करूनही विकतही पाण्याचा टँकर मिळेनासा झाला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी परवड झाली असून पाण्यासाठी नेमके काय करावे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. परिसरातील मांजरी, शेवाळेवाडी ही गावे पालिकेत समाविष्ट होऊन बरोबर एक वर्ष झाले आहे. मात्र, या गावांना पाण्यासह विविध प्राथमिक सुविधा पुरविण्यात पालिका प्रशासन वेग घेऊ शकले नाही. पावसाने ओढ दिल्याने सध्या या भागात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही गावे विकासासाठी पीएमआरडीएकडे असल्याने पाणीपुरवठ्याची जबाबदारी त्यांचीच असल्याचे सांगून पालिकेने हात झटकले आहेत.

तर पीएमआरडीएने बांधकाम व्यावसायिकांना आपापल्या विकसित केलेल्या सोसायट्यांना पाणी पुरवठ्याची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी ग्रामपंचायतकडून ज्या भागात पाणीपुरवठा व्यवस्था होती, त्याच व्यवस्थेवर पालिकेकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, जेथे ही व्यवस्था नाही अशा मोठ्या भागात कोणत्याही प्रशासनाकडून पाणीपुरवठा होत नाही. हे सर्व मिळकतदार स्वत: घेतलेल्या कूपनलिकेवर अवलंबून आहेत. या कूपनलिकांनाच आता पाणी नसल्याने शेवाळेवाडी, सोलापूर रोड, मांजरीफार्म, महादेवनगर, घुले वस्ती, गोपाळपट्टी, दरडी, चिलई, मुंढवा-मांजरी रस्ता आदी भागात पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

खासगी टँकरचा धंदा तेजीत

पाण्याचे स्रोत बंद झाल्याने सध्या परिसरात पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे खासगी पाण्याच्या टँकरला मोठी मागणी वाढली आहे. मात्र, हे टँकरही कमी पडू लागले असून रात्री अपरात्रीही ते पाणी टाकण्याचे काम करीत आहेत. टँकर लवकर मिळावा म्हणून जास्त पैसे मोजण्याबरोबरच थेट पाणी भरणा केंद्रावर जाऊनच टँकर घेऊन येण्याचा प्रयत्न काही नागरिक करताना दिसतात.

"कूपनलिकेचे पाणी अटल्याने एक एक हंडा पाणी जमा करावे लागत आहे. भाडेकरूंना पाणीपुरवठा कसा करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकर मागूनही वेळेत येत नाही. आठ-आठ दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे.'

-पार्वती बिराजदार गृहिणी, टकलेनगर

"घर सांभाळून नोकरी करणे, ही आगोदरच तारेवरची कसरत असते. त्यातच आता वेळेवर पाणी मिळत नसल्याने धावपळ करावी लागत आहे. लवकर पाणी मिळावे म्हणून टँकरला जास्त पैसे देण्याची तयारी दाखवूनही तो मिळत नाही. महानगरपालिकेने चांगला पाऊस पडेपर्यंत व पाण्याचे स्रोत सुरू होईपर्यंत तरी टँकरने पाणीपुरवठा केला पाहिजे.'

-ऋतुजा जगताप नोकरदार महिला, गोपाळपट्टी

"आम्ही प्रशासनाला कर भरूनही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. स्रोतच कोरडे पडल्याने नागरिकांनी पाणी कोठून आणावे ? अनेक गरीब कुटुंबे आहेत, त्यांना विकत पाणी घेणे शक्य नाही. पालिकेने किमान पाण्याची व्यवस्था तरी करावी.'

-अलका गायकवाड गृहिणी, शेवाळेवाडी

"पाणी पुरवठा विभागाला उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली जाईल. काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा कसा करता येईल, याबाबत प्रयत्न करण्यात येईल.'

-प्रसाद काटकर सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय

Web Title: Water Supply Issue In Manjri Villages Included In Municipality Lack Of Tanker Water Supply

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..