टँकरमध्ये मुरतंय पाणी! महापालिकेकडून महिनोन्‌महिने हिशेब देण्यास टाळाटाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water tanker

पुणे महापालिकेतर्फे प्रामुख्याने खडकवासला, भामा आसखेड धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो.

टँकरमध्ये मुरतंय पाणी! महापालिकेकडून महिनोन्‌महिने हिशेब देण्यास टाळाटाळ

पुणे - पुणे महापालिकेला (Pune Municipal) दर आठवड्याला किती उत्पन्न (Income) मिळाले आणि किती निधी खर्च (Expenditure) झाला याच्या प्रत्येक पैशाचा हिशेब (Account of Money) रोज घेतला जातो. मात्र, महापालिकेच्या टँकर (Water Tanker) भरणा केंद्रावरून किती टँकर भरले गेले याचा महिनोन्‌महिने हिशेब लावला जात नाही. जानेवारी, फेब्रुवारीची माहिती अद्याप सादर झालेली नाहीच, शिवाय २०२१ मधील माहितीही अपूर्णच आहे. महापालिकेच्या केंद्रावरून किती टँकरना पाणी भरले याची संबंधित अधिकाऱ्यांकडून पाणी पुरवठा विभागालाच देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने नेमके पाणी कुठे मुरतेच असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पुणे महापालिकेतर्फे प्रामुख्याने खडकवासला, भामा आसखेड धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. वर्षाला १८ टीएमसी पाणी वापरून देखील शहराच्या सर्व भागात पाणी मिळत नाही. अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने कायमच पाणी टंचाई आहे. त्यातच नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांत देखील पाणी पुरवठ्याची सक्षम यंत्रणा नसल्याने तेथील पाण्याचा प्रश्‍नही गंभीर आहे.

शहरातील पाणी टंचाई कमी करण्यासाठी महापालिकेकडून टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी महापालिकेचे टँकर आहेत. पण हे टँकर पुरेसे नसल्याने ठेकेदार नेमून पाणी पुरवठा केला जातो, त्यांच्या किती फेऱ्या झाल्या त्यावरून त्यांचे बिल काढले जाते. तसेच टँकर भरणा केंद्रावरून चलन घेऊन कोणालाही टँकरने पाणी उपलब्ध होते. यामध्ये विशेषतः खासगी टँकर चालकांचा समावेश आहे.

हेही वाचा: पुणे महापालिकेवर १५ मार्चपासून प्रशासक, विक्रम कुमार यांच्याकडे जबाबदारी

महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रावरून रोज शेकडो टँकर पाणी भरून घेऊन जात आहेत. दिवसरात्र टँकरची रांगा लागलेल्या असतात. त्याची सर्व माहिती मुख्य खात्याकडे दर महिन्याला सादर करणे आवश्‍यक आहे. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२१ मध्ये स्वारगेट, चतुःश्रृंगी, होळकर, एसएनडीटी या केंद्राची माहिती अद्याप आलेली नाही. तर नोव्हेंबर, ऑक्टोबर, ऑगस्ट जून या महिन्यांची सुद्धा अर्धवट माहिती आहे. संबंधित अधिकारी, कर्मचारी याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करत आहेत.

याठिकाणी होतो टँकर भरणा

महापालिकेचे शहरात प्रमुख सहा ठिकाणी विभागीय टँकर भरणा केंद्र आहेत. त्यामध्ये स्वारगेटच्या अंतर्गत पर्वती, पद्मावती व धायरी येथे टँकर भरता येतो. चतुःशृंगी, वडगाव शेरी, होळकर पूल रामटेकडी येथे प्रत्येकी एक केंद्र आहे. तर एसएनडीटीच्या अंतर्गत पटवर्धन बाग येते टँकर भरणा केंद्र आहे.

महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रावरून प्रत्येक महिन्याची माहिती मागवली जाते, पण ही माहिती दिली जात नसेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल व ही माहिती अद्ययावत ठेवली जाईल.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा

Web Title: Water Tanker Account Of Money Issue Pune Municipal Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top