पुणेकरांवर कराचा बोजा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

महापालिका प्रशासनाकडून अर्थसंकल्पात पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांची वाढ सूचविण्यात आली आहे. मात्र, या वाढीला स्थायी समिती मंजुरी देणार की ती नाकारून पुणेकरांना दिलासा देणार, याकडे आता लक्ष लागले आहे. 

पाणीपट्टीत १५, मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांची वाढ
पुणे - महापालिका प्रशासनाकडून अर्थसंकल्पात पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांची वाढ सूचविण्यात आली आहे. मात्र, या वाढीला स्थायी समिती मंजुरी देणार की ती नाकारून पुणेकरांना दिलासा देणार, याकडे आता लक्ष लागले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 पुढील वर्षीचा (२०२०-२१) ६ हजार २२९ कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी मांडला. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी कोणतेही नवे स्रोत अर्थसंकल्पात सुचवण्यात आलेले नाहीत. मात्र, हमखास उत्पन्न देणाऱ्या मिळकतकरात आणि पाणीपट्टीत वाढ करण्याची शिफारस या अर्थसंकल्पात केली आहे. पाणीपट्टीत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेण्यात आला होता. ‘चोवीस बाय सात’ या योजनेसाठी या वाढीस मान्यता देण्यात आली. प्रत्यक्षात या योजनेच्या प्रगतीबाबत प्रशासनाने एकीकडे मौन बाळगत, दुसरीकडे मात्र पुढील वर्षीही १५ टक्के पाणीपट्टीत वाढ करण्याची सुचवली आहे. पाणीपट्टीत आणि मिळकतकरातील वाढीमुळे महापालिकेच्या तिजोरीत वर्षाकाठी तीनशे ते सव्वातीनशे कोटी रुपयांची भर पडण्याचा अंदाज आहे. 

अशी होणार वाढ
पाणीपट्टी करपात्र रक्कम           सध्याची पाणीपट्टी     प्रस्तावित पाणीपट्टी
१ ते १००० रुपये                  १५३३           १, ७६३
१००१ ते ३०००                   १,७०३          १,९५३
३००१ते ५०००                     १,८७५         २,१५६
५००१ ते पुढे                         ४,२३२         ४,८६७

पूरग्रस्त वसाहती                           ५१२ रुपये       ५८९
अमृततुल्य(शहर आणि नवी गावे)      १, ०२२          १,१७५

बांधकाम क्षेत्रातील मंदीचा फटका
चालू वर्षीच्या (२०१९-२०) अर्थसंकल्पात बांधकाम परवानगीतून ८९९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे गृहीत धरण्यात आले होते. प्रत्यक्षात डिसेंबरअखेरपर्यंत ५२० कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. मंदीची जाणीव प्रशासनालादेखील झाल्यामुळे पुढील वर्षी ( २०२०-२१) मात्र बांधकाम परवानगीतून केवळ ७५० कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे प्रशासनाने गृहीत धरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water tax 15 and income tax 12 Percentage increase in pune