#WaterCrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा

महेंद्र बडदे 
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता  पीएमआरडीएच्या क्षेत्रात पाणीपुरवठा कोठून करणार, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून, तिची आतापर्यंत केवळ एकच बैठक पार पडली आहे. 

पुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता  पीएमआरडीएच्या क्षेत्रात पाणीपुरवठा कोठून करणार, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून, तिची आतापर्यंत केवळ एकच बैठक पार पडली आहे. 

पीएमआरडीएचे क्षेत्र हे मुठा नदीच्या खोऱ्यातील पाणीपुरवठ्याच्या लाभक्षेत्रात येत आहे. सध्या खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जात असून, उर्वरित पाणी हे शेतीसाठी राखून ठेवावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात केली गेली आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या क्षेत्रात पाणीपुरवठा कोठून केला जाणार, याचे उत्तर अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सरकारकडून समितीची स्थापना
एकीकडे महापालिका पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच दुसरीकडे पीएमआरडीएच्या हद्दीत पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न समोर आला आहे. या क्षेत्रासाठी तीन टीएमसी पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी केली गेली होती. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीत जलसंपदा, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सचिव, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पीएमआरडीएच्या आयुक्तांचा समावेश आहे. मात्र या समितीची आतापर्यंत एकच बैठक पार पडली आहे.

पाणीवापराचा आराखडा
मावळ, मुळशी, हवेली, भोर, दौंड, शिरूर, खेड, पुरंदर, वेल्हे तालुक्‍यांतील काही भागांचा पीएमआरडीएच्या क्षेत्रात समावेश आहे. पीएमआरडीएच्या क्षेत्रात म्हाळुंगे, वाघोली आदी ठिकाणी १४ टीपी स्कीमचा प्रस्ताव आहे. रिंगरोडलगत रहिवासी आणि व्यावसायिक आस्थापना उभ्या करण्याचे नियोजन आहे. पीएमआरडीएने केलेल्या मागणीची दखल घेत नगरविकास विभागाने पाणीसाठ्यांचे सर्वेक्षण करणे, भविष्यातील पाणीसाठ्याचे नियोजन आदींचा समावेश असलेला आराखडा तयार करण्याचे ठरविले होते. 

समितीसमोर सर्व अहवाल सादर केले असून, उर्वरित माहिती लवकरच देण्यात येईल. महापालिकेच्या पाणीबचतीचा आराखडा सादर करावा लागणार आहे. जलसंपदा विभागाचा अहवालाची माहिती देण्यात आली आहे. दसऱ्यानंतर या समितीची दुसरी बैठक होईल.
- किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीए 

Web Title: WaterCrisis PMRDA Water